निकाल ठरवणार आगामी राजकारणाची दिशा

0

विधानपरिषदांच्या सहा जागांची गुरूवारी मतमोजणी

मुंबई (राजा आदाटे) । विधान परिषद निवडणुकीच्या 6 जागांसाठी झालेल्या मतदानाची गुरूवारी मतमोजणी आहे. राज्यात विधान परिषेदेसाठीच्या सहा जागांवर मतदान पार पडले. यात वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, आणि अमरावती या जागेवर भाजपला विजयाची खात्री आहे. तर उरलेल्या चार जागांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलीय. या ठिकाणी भाजप निर्णायक भूमिकेत आहे. या विधानपरिषद निवडणुकीला क्रॉस वोटिंगचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात अभद्र युतीचे पेव फुटल्याचेही समोर आले आहे. सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना भाजपने या निवडणुकीत एकत्र संसार न करता विरोधकांना मदत करत एकमेकांना खिंडीत गाठण्याचेच काम केले आहे. विधानपरिषद निवडणुकीचे पडसाद आगामी राजकारणातही उमटण्याची चिन्ह आहेत. निवडणुकांचे मतदान पाहता दोन जागा भाजप, दोन राष्ट्रवादी, एक जागा काँग्रेसला अपेक्षित आहे. तर एकाही जागेवर शिवसेनेला यश मिळाले नाही तर आगामी काळात भाजप विरोधात सर्व पक्ष ही संकल्पना धूसर होईल आणि तोच भाजपला दिलासा मिळणार आहे.

अभद्र युत्यांचे पेव आणि राजकिय हिशोब चुकते
लातूर-बीड-उस्मानाबाद मध्ये मुंडे विरुद्ध मुंडे अशी प्रतिष्ठेची लढाई आहे. रमेश कराडांच्या माघारीनं राष्ट्रवादीवर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की, ओढवली. राष्ट्रवादीच्या बंडखोर 6 सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळाला होता. काकू-नाना आघाडीच्या 9 नगरसेवकांसह इतर दोन अपात्र नगरसेवकांना दणका, बसला. बीडमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला साथ दिल्याचे दिसून आले. शिवसेनेने कुठलीही भूमिका न घेतल्याने भाजपला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मिळून बनलेल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात सरळ लढत झाली. येथे काँग्रेस, शेकाप, स्वाभिमान पक्षाने तटकरेंच्या चिरंजीवांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे या पक्षांच्या बलाबलानुसार मतदान झाले असते तर निवडणूक चांगली रंगली असती. येथे केवळ ‘लक्ष्मीदर्शना’चा प्रभाव नाही, तर या निमित्ताने काही राजकीय हिशेब चुकते करण्याचीही संधी संबंधित राजकीय पक्षांच्या नेत्यांनी साधली आहे. त्यामध्ये राणेंच्या ‘स्वाभिमान’ने तटकरेंच्या बाजूने दान टाकले. येथेही नेहमीप्रमाणे सेना-भाजपने परस्परांवर कुरघोडीचे राजकारण केले. त्यासाठी पालघर लोकसभेची पोटनिवडणूक निमित्त ठरल्याचे सांगितले जाते. येथील भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना उमेदवारी देऊन सेनेने केलेल्या ‘दगाबाजी’बद्दल अद्दल घडवण्यासाठी भाजप नेत्यांनी या निवडणुकीची संधी साधली असल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर मागील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेवर आल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सेनेला कोंडीत पकडण्याचा कार्यक्रम वेळोवेळी ठिकठिकाणी केलेला आहे. तोच कित्ता याही निवडणुकीत कायम राहिला असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तटकरेंची सीट पक्की मानण्यात येते. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना पहिल्या क्रमांकावर असला तरी त्यांना भाजपची साथ महत्वाची होती. मात्र येथेही पालघर लोकसभा निवडणुकीतील सेनेच्या खेळीने नाराज भाजपची राष्ट्रवादीला साथ असल्याची चर्चा होती. परभणीत मात्र काँग्रेसला निवडणूक सुकर होण्याची चिन्ह आहेत.

अनेकांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लातूर-बीड-उस्मानाबाद या जागेसाठी भाजपचे उमेदवार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात सामना होणार आहे. सिंधुदूर्ग-रत्नागिरी-रायगड या जागेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात सामना होत आहे. नाशिकच्या जोगेसाठी शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि राष्ट्रवादीचे अ‍ॅड .शिवाजी सहाणे यांच्यात सामना रंगला आहे. येथे अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी याचे पारडेही जड मानले जाते. अमरावतीच्या जागेसाठी भाजपचे प्रविण पोटे-पाटील आणि काँग्रेसचे माधव गडियाल यांच्यात थेट लढत आहे. परभणी-हिंगोलीच्या जागेसाठी काँग्रेसचे सुरेश देशमुख आणि शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांच्यात सामना आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या सहाव्या जागेसाठी काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ आणि भाजपचे रामदास आंबटकर यांच्यात लढाई आहे.

पुरेपुर मतदान झाले
विधानपरिषद झालेल्या मतदानाची टक्केवारी नाशिक- 100टक्के, बीड-लातूर-उस्मानाबाद-100 टक्के (1005 पैकी 1004), सिंधुदूर्ग – 99 टक्के मतदान, अमरावती- 100 टक्के, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर-99.35 (308 पैकी 306) तर परभणी-हिंगोली -99.60 (501 पैकी 499) टक्के मतदान झाले.