मुंबई । मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा भवनाच्या सावळ्या गोंधळाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने एक दिवसीय उपोषण केले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँम्पसमध्ये विद्यार्थी संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी उपोषणाला बसले. आमदार किरण पावसकर आणि आमदार विद्या चव्हाण यांच्या मार्गदर्शनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचा त्रास संपत नाही. जर हा त्रास लवकर संपला नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल, असे मुंबई विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले यांनी सांगितले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मागण्या
निकाल जाहीर झाल्यावर दुसर्या दिवशीच मार्कशीट देण्यात यावी. हेल्पडेस्कच्या नावाखाली विद्यार्थांना तासनतास वाट पाहावी लागत आहे. हेल्पडेस्कसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अनुभवी व्यक्ती नेमावा. क्युपी कोड आणि बारकोड ह्या तांत्रिक बाबीमध्ये विद्यार्थांना अडकवून विद्यार्थांची पिळवणूक केली जाते ती तात्काळ थांबवावी. पुनर्मुल्यांकन आणि फोटो कॉपीसाठी वाढणार्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता ही सुविधा विद्यार्थांसाठी मोफत करावी.