मुंबई : मुंबई विद्यापिठाचे निकाल जर 31 जुलैपर्यंत लागले नाही, तर कुलगुरूंच्या राजीनाम्याच्या मागणीला घेऊन विद्यापिठाच्या फोर्ट येथील कॅम्पसमध्ये तीव्र आंदोलन करू, असा इशारा स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या संघटनेने दिला आहे. जर निकाल लागले नाहीत तर येणार्या काळात कुलगुरूंना विद्यापीठ संकुलात फिरू देणार नाही, असेही या संघटनेने म्हटले आहे.
निकालाबाबत कुलगुरुंची पोकळ आश्वासने
25 जुलै रोजी एसएफआयच्या वतीने विद्यापिठाच्या पदवीचे निकाल त्वरित लावावेत, या मागणीला घेवून मुंबई विद्यापीठ कालिना येथे तीव्र निदर्शने केली होती. या आंदोलनानंतर विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. तेव्हा विद्यार्थी संघटनांनी मुंबई विद्यापिठाचे नियमित व दुरस्त शिक्षणातील विद्यार्थ्यांचे पदवीच्या तृतीय वर्षांचे निकाल त्वरित जाहीर करा, या मागणीचे पत्र कुलगुरू यांना देण्यात आले व चर्चा करण्यात आली होती. यावर कुलगुरू यांनी विद्यापीठाच्या पदवीचे निकाल 31 जुलैपर्यंत लागतील, असे आश्वासन एसएफआयच्या शिष्टमंडळाला दिले होते.
विद्यार्थ्यांमधील वाढता मानसिक ताण
तीन महिने उलटून गेलेले आहेत. मात्र नियमित विद्यार्थ्यांचे निकाल अजून लागले नाहीत तसेच विद्यापीठ प्रशासन दुरस्त विद्यार्थ्यांचे निकालही लांबणीवर टाकत आहेत. विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे विद्यापीठाला अनिवार्य आहे. मात्र मुंबई विद्यापीठ हे नियम धाब्यावर ठेवत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार विद्यापिठाला नाही. निकालाला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांचे पदवीत्तर शिक्षण धोक्यात आलेले आहे. विद्यार्थी अत्यंत संतापलेले आहेत. त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, असे एसएफआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.