नुकताच बारावीचा निकाल घोषित केला गेला. वर्षभर विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत कितपत यशस्वी झाली याची सर्वच विद्यार्थ्यांना उत्सुकता असते. निकालाची वाट पालकवर्गसुद्धा आतुरतेने बघत असतो. आपल्या पाल्याने वर्षभर केलेल्या अभ्यासाचं फलित काय असणार? याची हुरहूर आईवडिलांना लागली असते. आपला मुलगा गुणवत्ता यादीत यावा, तो डॉक्टर, इंजिनीअर, वकील बनावा, असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते. शिक्षण घेऊन तो यशस्वी उद्योजक किंवा शेतकरी बनावा, असे पालकांच्या तोंडून ऐकायला आजकाल मिळत नाही. मुलाची आवड, निवड व बुद्धिमत्ता लक्षात न घेता आपला मुलगा डॉक्टर, इंजिनीअर बनण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. त्यासाठी महागडे शिकवणी वर्गसुद्धा लावून दिल्या जातात. पण निकाल लागतो, तेव्हा सर्वस्वी मुलांच्या डोक्यावर अपयशाचे खापर फोडले जाते. वर्षभर अभ्यास केला नाही, झोपा काढल्या, असल्या शब्दांचा भडिमार करून त्याची हेटाळणी केली जाते. परिणामी विद्यार्थी आई-वडिलांची इच्छा पूर्ण न करण्याचे शल्य मनात जोपासतात व जीवनात काहीच करू शकत नाही या मनोवृत्तीकडे वळतात. प्रसंगी आत्महत्येसारखे पाऊलसुद्धा उचलतात.
आपला मुलगा डॉक्टर, इंजिनीअर बनावे, असे कोणत्याही पालकाला वाटणे गैर नाही. पण मुलांच्या बौद्धिक क्षमतेला जर ते झेपत असेल तरच! कारण मुलांच्या जीवापेक्षा काहीच महत्त्वाचे नाही. काही मुलं अपयशाच्या भीतीमुळे नैराश्याकडे वळतात, तर काही जीवनात काहीच करू शकत, नाही असा खुळा समज करून आत्मविश्वास हरवून बसतात. त्यासाठी निकाल हातात घेताना प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना समजून घेणे तितकेच महत्त्वाचे असते. परीक्षेच्या काळापासून ते निकालापर्यंतचा काळ हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. एका दडपणाखाली त्या काळात तो वावरत असतो. तेव्हा मुलांना आईवडिलांनी धीर देत त्यांच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे असते. Failure is not the opposite of success. It’s part of success!! आपल्यासमोर जगातील अनेक उदाहरणे देता येतील, ज्यांनी अपयशानंतर यशाची उत्तुंग शिखर पार करत अवघ्या जगावर कीर्तीची छाप सोडली. थॉमस एडिसन नावाच्या शास्त्रज्ञाने विजेच्या दिव्याचा शोध लावला, त्यांनाही अपयशाचा कित्येकदा सामना करावा लागला होता, तेव्हा कुठे ते विजेचा शोध लावू शकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत स्वतःला घडवले व देशातच नाही तर अवघ्या जगावर आपल्या विचारांची छाप सोडली. एपीजे अब्दुल कलाम आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर अवकाशयंत्र तयार करत, राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचू शकले, तर आपण का नाही? फक्त गरज आहे ती सातत्याची, मेहनतीची व आत्मविश्वासाची…! यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अपयशाच्या मार्गक्रमावरून प्रवास करणे अत्यंत गरजेचे असते.
अपयशातच यश लपलेले असते. तेव्हा अपयशाचा सामना करायला आपण शिकले पाहिजे. जीवनात सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे असते. वर्षभर केलेला अभ्यास व त्यानुषंगाने मिळालेल्या गुणांची कमतरता हेच नकारात्मक मनोवृत्तीकडे घेऊन जाण्यास कारक ठरते. खरंतर दहावी-बारावीची परीक्षा म्हणजे जीवनातील शेवटची परीक्षा नसतेच, पण तरीही पालक आणि विद्यार्थी त्याला आपले संपूर्ण जीवन समजून बसतात आणि याच नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. जीवनात यश मिळवायचे असेल तर अनेक संकटांना समोर जायचे धाडस ठेवायला हवे. आता दहावीचा निकाल घोषित करण्यात येईल, तेव्हा निकाल हातात घेताना, आईवडिलांनी मुलांना शाब्दिक आधार देत त्यांच्यात आत्मविश्वासाची पेरणी करणे गरजेचे आहे. मुलांवर कुठलेही दडपण न आणता त्याला जे क्षेत्र हवे आहे, ज्यात त्याला आवड आहे. ज्यात तो यशस्वी होऊ शकतो, आपले करिअर करू शकतो, तीच फिल्ड त्यांना निवडू द्या. काही विद्यार्थ्यांना खेळात गोडी असते तर काहींना चित्र काढण्यात, काहींना डॉक्टर बनायचे असते, तर काहींना इंजिनीअर, काहींना या कशातच गोडी नसते तर शेती-उद्योग धंद्यात त्याला रुची असते. मुलांची रुची कशात आहे, हे लक्षात घेऊन समोरचे क्षेत्र निवडून देणे ही आईवडिलांची जबाबदारी आहे. तेव्हा आपल्या मुलांची रुची कशात आहे, हे जाणून घेत त्यांनी आपल्या मुलांच्या भवितव्याची वाटचाल सुरू करावी.
-प्रा. वैशाली देशमुख
रा. कुही, जि. नागपूर
7420850376