निकृष्ट कामामुळे जुना सातार्‍यातील रस्ता ‘जैसे थे’

0

डागडूजीनंतर चार दिवसातच निखळली खडी ; ‘जनआधार’ आक्रमक

भुसावळ: शहरातील जुना सातारा भागात 20 रोजी वेदांत भालचंद्र दिवेकर (17) या युवकाचा खराब रस्त्यांमुळे अपघात होवून ट्रकखाली आल्याने मृत्यू झाल्यानंतर सत्ताधारी व पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. जनआधार विकास पार्टीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग येवून जुना सातारा भागातील रस्त्याच्या डागडुजीला 22 रोजी सुरूवात झाली मात्र चार दिवसातच रस्त्याची ‘जैसे थे’ अवस्था झाल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जनआधार विकास पार्टीने याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

निकृष्ट कामामुळे संताप
शहरातील वर्दळीच्या सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाल्यानंतरही सत्ताधारी व पालिका प्रशासन हातावर हात ठेवून असल्याने व अटल योजनेच्या कामामुळे रस्त्यांच्या कामांना ब्रेक लागल्याचे सांगत असल्याने शहरवासीयांनी किमान रस्त्याची चांगल्या पध्दतीने डागडूजी करावी, अशी माफक अपेक्षा केल्यानंतरही जुना सातार्‍यात अत्यंत निकृष्ट पध्दतीने खड्डे बुजवण्यात आल्याने पुन्हा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. ठेकेदाराने विहित पध्दतीने खड्डे बुजवणे गरजेचे असतांना थातूर-मातूर पध्दतीने खड्डे बुजवले जात असल्याचा आरोप जनआधारच्या नगरसेवकांनी केला आहे. सुमारे 20 लाख रुपये खर्चून शहरातील खड्डे बुजवण्याचे काम देण्यात आले असल्याची माहिती असून कामांचा दर्जा राखला न गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनआधारच्या नगरसेवकांनी दिला आहे.