मामाजी टॉकीज रस्त्याच्या निकृष्ट कामानंतर जनआधारचा इशारा
भुसावळ- दगडी पूल ते मामाजी टॉकीजपर्यंतच्या निकृष्ट कॉँक्रिटीकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा तसेच या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी जनाधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास भीमराव पगारे यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तर तीव्र आंदोलनाचा इशारा
निवेदनाचा आशय असा की, मामाजी टॉकीज रस्ता कामाचा ठेका आशा कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला होता शिवाय 52 लाख 63 हजार रुपयांना कामाचा ठेका देण्यात आला मात्र ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्त्यावरील सिमेंटचे मटेरीअल आत्ताच निघाल्याने कामाचा दर्जा स्पष्ट झाला आहे. यापुर्वीही मुख्याधिकार्यांनी या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला कामात सुधारण करण्याबाबत नोटीस बजावली होती मात्र त्यानंतरही सुधारणा झाली नाही. आता ठेकेदाराला वाचवण्यासाठी रस्त्याची डागडुजी केली जात आहे. डागडुजी तत्काळ थांबवून संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनाधारने केली असून दखल न घेतल्यास तीव आंदोलन छेडण्याचा इशारा गटनेते उल्हास पगारे यांनी दिला आहे.