निकृष्ट दर्जांच्या भंगार बसमधून सर्वसामान्यांचा जीवघेणा प्रवास

0

वायपर, साईड लाईटस् नसल्याने बसवर आरटीओची कारवाई ः

जळगाव – शहरातून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे जाणार्‍या एम- एच-19–1600 या परिवहन महामंडळाच्या बसवर वायपर आणि साईड लाईट्स नसल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सर्वसामान्यांची लाईफलाईन समजली जाणार्‍या बसचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असून या दर्जा खालावलेल्या निकृष्ट बसेसमधून परिवहन महामंडळांचा प्रवाशांसोबत जीवघेणा खेळ सुुरु आहे. एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतर परिवहन महामंडळाला जाब येणार का? असा संतप्त

गंभीर अपघातानंतर आरटीओला जाग

एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठाजवळ ट्रकचा स्टेअरींग रॉड तुटल्यामुळे ट्रकवर समोरुन येणार्‍या कालिपिली वाहनावर आदळून झालेल्या अपघातात 9 जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामुळे निकृष्ट दर्जा असलेली, भंगार झालेली वाहने रस्त्यावर धावत असल्याचे या अपघातांमुळे समोर आली. दरम्यान अशा वाहनांमधून आरटीओ,वाहतूक तसेच महामार्ग पोलिसांच्या आशिवार्दाने खाजगी प्रवाशी वाहतूक होत असून कारवाई करणार असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. याला अनुसूरुन उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून महामार्गावर वाहनांची तपासणी मोहिम राबविण्यात आली.

आरटीओकडून बस करण्यात आली जमा

आरटीओ विभागाचे कर्मचारी राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी तपासणी करत होते. या तपासणीदरम्यान विद्यापीठाकडे जात असलेली बस कर्मचार्‍यांनी थांबविली. बसची तपासणी केल्यानंतर या बसला समोरील वायपर तसेच साईड लाईटस् नसल्याचे समोर आले. यानंतर उपप्रादेशिक विभागाकडून बसमधील वाहक तसेच चालकाला दंडात्मक कारवाईचा मेमो देण्यात देवून बस जमा करण्यात आली. विभागाने बस जमा केल्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. यात विद्यापीठात जाणारे अनेक विद्यार्थीनी बसमध्ये होते. या सर्व विद्यार्थ्यांचे वेळापत्रक कोलमडले. दुसरी बस येईलपर्यंत विद्यार्थ्यांना रस्त्यावर ताटकळत उभे राहण्याची वेळ आली. पुढीची बस तासाभरानंतर आल्याने त्यातून विद्यार्थी विद्यापीठात पोहचले.

भंगारा बसमधून असुरक्षित प्रवास

जुन्या बसस्थानकावर प्रतिनिधीने पाहण केली असता, याठिकाणी बहुसंख्य बसेस या निकृष्ट दर्जाच्या आहेत. विशेष म्हणजे जेवढ्या कमी अंतरावर धावणार्‍या बसेस आहेत, त्याच निकृष्ट असल्याचेही वास्तव आहे. विभागाकडून दर्जा खालावलेल्या बसेस दुरूस्त करुन पुन्हा रस्त्यावर आणल्या जातात, यामुळे भविष्यात पिंपळकोठा येथील अपघाताची पुनरावृत्ती बसच्या अपघातव्दारे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वर्षापासून याच बसमधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरु असल्याचे चित्र आहे.

आरटीओला कारवाईसाठी फक्त बसच दिसली ?

शहराच्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. कालच्या घटनेत वाहनांच्या दर्जाबाबत तपासणी होत नसल्याचे तर दुसरीकडे बेकायदा गुरांप्रमाणे प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याची बाब समोर आली. आरटीओ, वाहतूक तसेच महामार्ग विभागाकडून याकडे कानाडोळा होत असल्याने पिंपळकोठा येथील घटना घडल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान आरटीओ विभागाला कारवाईसाठी केवळ बस दिसली काय? इतर वाहनांचे काय? असाही सवाल उपस्थित होत आहे.