निकृष्ट दर्जाच्या शेगड्यात त्वरित बदलून देणार

0

पुणे । जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाड्यांना पुरविण्यात आलेल्या शेगड्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे निदर्शनास आले आहे. या शेगड्यांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये ज्या शेगड्या निकृष्ट दर्जाच्या आहेत. त्या त्वरीत बदलून देण्यात येतील. त्याबाबत संबंधीत वितरकाला सूचना देण्यात येतील, असे आश्‍वासन जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी दिले.यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजीत सर्वसाधारण सभेमध्ये जिल्ह्यातील अंगणवाड्यांना देण्यात आलेल्या काही शेगड्या खराब असून, त्यातून गॅस लिकेज होत आहे. त्यामुळे या शेगड्या चांगल्या दर्जाच्या देण्यात याव्या अशी मागणी सदस्य सुनिता गावडे यांनी केली. गावडे यांनी अंगणवाड्यांमधील शेगड्यांचा प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर अध्यक्ष देवकाते यांनी शेगड्या तपासणीबाबत सूचना दिल्या.

1 हजार 905 शेगड्यांचे वाटप
अंगणवाड्यांना देण्यात आलेल्या शेगड्या या महिला व बालकल्याण विभागाकडून एका फाउंडेशनच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. तसेच सीएसआरमधूनही अंगणवाड्यांना मोफत शेगड्या पुरविल्या जात आहेत. आत्तापर्यंत 1 हजार 905 शेगड्यांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, या शेगड्यांमधील काही शेगड्या या निकृष्ट दर्जाच्या असून, त्यातून गॅस लिकेज होत आहे. त्यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. या शेगड्या चांगल्या दर्जाच्या असाव्या, अशी मागणी सदस्यांनी केली. ज्या अंगणवाड्यांमधील शेगड्या खराब आहेत अशा शेगड्या त्वरीत बदलण्यात येतील. भविष्यातील धोका लक्षात घेता त्याबाबत त्वरीत कार्यवाही करून संबधीत वितरकाला सूचना देऊन त्या शेगड्यांची चौकशी करावी. खराब शेगड्यांची पाहणी करून यापुढे सर्व शेगड्या तपासून देण्याच्या सूचना अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी सभेमध्ये दिले.