निखिल वाघने पटकाविला द्वितीय क्रमांक

0

खासबाग मैदानावर पार पडली स्पर्धा

देहुरोड : 19 वर्षीय राज्य शालेय कुस्ती स्पर्धेत देहुरोड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयातील निखिल मच्छिंद्र वाघ याने 55 किलो गटात ग्रीक रोमन प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती शाहू खासबाग मैदानावर स्पर्धा झाली. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर आणि भैरवनाथ कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ पाचगाव श्री नृसिंह कुस्ती आखाडा यांच्या सहकार्याने या कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती येथे 17 वर्षे मुले शालेय राज्य कुस्ती स्पर्धेत अभिषेक पंढरीनाथ जाधव 51 किलो गटात ग्रीको रोमन प्रकारात सहभागी झाला होता. निखील वाघ व अभिषेक जाधव हे पुणे विभागाच्या सोलापूरातील विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्य स्पर्धेत सहभागी झाले होते. अजित टावरे याची 60 किलो गटात ग्रीको रोमन प्रकारात सोलापूर येथे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.

आठ विभागातील खेळाडू सहभागी

स्पर्धेत राज्याच्या आठ विभागातील कुस्तीगीर सहभागी झाले होते. या स्पर्धेला शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक व संताजी घोरपडे यांचे वंशज सरकार भवानीसिंग घोरपडे, उप महाराष्ट्र केसरी सोलापूर तालीम संघाचे अध्यक्ष भरत मेकाले, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, क्रीडा अधिकारी बरबडे यावेळी उपस्थित होते. प्राचार्य अशोक काटे, उप प्राचार्य बाळासाहेब शेंडे, पर्यवेक्षक यु.जी.सोनवणे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य व क्रीडा शिक्षक राजेंद्र काळोखे, अनुराधा घोडके, मनिषा कठाळे, लिनायक लोणकर सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी तीनही कुस्तीगीरांनी घवघवीत यश मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.