निगडी। लहान मुले विविध वस्तू वेगळ्या करून जोडतात. त्यांच्यातील कल्पकता पाहून आपण भारावून जातो. अशीच कल्पकता निगडीतील ज्ञान प्रबोधिनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी असून, ‘अटल इनोव्हेशन मिशन’ उपक्रमातून या विद्यार्थ्यांनी दुचाकी, सायकल, पंखे, सीपीयू, प्रिंटर अशा विविध वस्तूंचे सुटे भाग वेगळे करून कमीत कमी वेळेत त्या वस्तू पुन्हा योग्यरितीने जोडण्याची किमया करून दाखवली. विद्यार्थ्यांची ही कल्पकता पाहून उपस्थित शिक्षकही भारावून गेले. शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त ‘प्रॅक्टिकल’ ज्ञानावर भर देण्यासाठी केंद्र सरकारने ‘अटल इनोव्हेशन मिशन’ योजना सुरू केली आहे. प्रॅक्टिकलबरोबर प्रश्न सोडविणारे आव्हानात्मक प्रॅक्टिकल करायचे. त्यातून संशोधक तयार व्हायला पाहिजेत, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.
30 ते 35 तज्ज्ञांची टीम
‘यंत्र खोलो व जोडो’ ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभागी होऊन प्रात्यक्षिके करून दाखविली. यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळाला. त्यांच्या प्रॅक्टिकल ज्ञानामध्ये भर पडली. तसेच टाकाऊ साहित्यापासून विद्यार्थ्यांनी विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. या प्रकल्पांसाठी ज्ञानप्रबोधिनी शाळेने काम करण्यास सुरुवात केली. 30 ते 35 तज्ज्ञांची एक टीम तयार केली आहे. त्यामध्ये विज्ञान, गणित, संगणक, तंत्रज्ञानाचे शिक्षक आणि उद्योजक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर पडणार आहे. विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांचे भवितव्य होईल. देशाला नवे संशोधक भेटतील, अशी अपेक्षा आहे.
योजनेसाठी ज्ञान प्रबोधिनी शाळेची निवड
‘अटल इनोव्हेशन मिशन’ या योजनेंतर्गत भारतातील ज्या शाळेत शालेय पाठ्यपुस्तकीय शिक्षणाव्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीने शिक्षण दिले जाते, विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये काही प्रयोग केले जातात, अशा शाळांना ‘अटल टिंकरिंग लॅब’साठी अर्ज पाठवायचे होते. भारतातून 14 हजार शाळांनी यासाठी अर्ज भरले असून, त्यापैकी 457 शाळा या निकषात पात्र ठरल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील 46 शाळा आणि पुण्यातील 10 शाळांचा समावेश आहे. निगडीतील ज्ञान प्रबोि धनी शाळाही त्यामध्ये निवडली गेली. त्यामध्ये पाचवी, सहावी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे ‘प्रॅक्टिकल’ ज्ञान वाढावे, यासाठी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
विविध प्रयोगाद्वारे प्रबोधन
या उपक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांना चुंबकीय, स्थिर विद्युत ऊर्जा या विषयांवर वैज्ञानिक खेळ दाखवण्यात आले. काही कृती विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आल्या. गोष्टीच्या व विविध साधनांच्या आधारे ध्वनीची निर्मिती कशी होते, हे शिक्षकांनी प्रयोगाद्वारे सांगितले. व्हिडिओच्या आधारे ध्वनी विषयीच्या कल्पना सांगण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यास करून सुटे भाग केलेल्या वस्तूंची जोडणी केली. त्यामध्ये वापरलेली यंत्रे, त्यामागील शास्त्रीय तत्त्व, विज्ञानाची संकल्पना याची मांडणी कागदावर लिहिणे, दिलेल्या साहित्यातून वर्किंग मॉडेल तयार करणे, मॉडेल बनविताना कशाप्रकारे बनविला आहे, ते विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.