शीघ्रकृती दलाच्या पथकामुळे प्रकार उघडकीस
देहूरोड : मुंबर्ट-पुणे महामार्गाशेजारी निगडीजवळ लष्कराच्या मोकळ्या जागेत देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनावरांची बेकादा कत्तल होत असल्याचा प्रकार लष्कराच्या गस्ती पथकामुळे उघडकीस आला. सोमवारी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. लष्कराचे वाहन पाहुन कत्तल करणारे लोक पळून गेले. घटनास्थळावर एक रिक्षा, 17 जीवंत जनावरे आणि कत्तल केलेल्या जनावरांचे मांस आढळून आले. देहूरोड पोलिसांनी ही जनावरे धामणे येथील गोशाळेला सुपुर्द केली आहेत.
अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल
निगडीजवळ स्मशानभूमीच्या शेजारी लष्कराच्या मोकळ्या जागेत जनावरांची बेकायदा कत्तल सुरु असल्याचा प्रकार लष्कराच्या क्युआरटी (शीघ्र कृती दल) पथकाने उघडकीस आणला. पथकाला पाहताच संबंधितांनी येथून धुम ठोकली. घटनास्थळावर वासरे, तीन रेडकू, दोन बैल अशी एकूण 17 जनावरे, कत्तल केलेल्या जनावरांचे मांस आणि एक रिक्षा (क्रमांक एमएच 14 पीयु 2509) आढळुन आली. ही घटना देहूरोड पोलिसांना कळविण्यात आली. देहूरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यल पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी घटनास्थळी पथकासह भेट दिली. सर्व जीवंत जनावरे धामणे येथील संत तुकाराम गोशाळेत जमा केली आहेत. घटनास्थळावर सापडलेली रिक्षा ताब्यात घेण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुध्द भादवि 474, 34, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 5(अ)(2) क, 8(बक) आणि 9(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. लष्कराचे लांस नायक समशेर राजेंद्र सिंग यांनी फिर्याद दिली आहे.