निगडीतील ध्वज फडकता ठेवण्यात येताहेत अडचणी

0

चार महिन्यांत आठ वेळा कापड फाटले

निगडी : देशाच्या राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम नव्या पिढीच्या मनात कायम रुजत राहावे, या हेतूने पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात सुमारे 107 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाची उभारणी केली. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात आली. त्यानंतर मात्र बहुतांश वेळा हा राष्ट्रध्वज काढून ठेवण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांत तब्बल आठ वेळा राष्ट्रध्वजाचे कापड फाटले होते. या ध्वजाचे वजन 80 किलो आहे. वार्‍याचा वेग आणि वजनामुळे वारंवार ध्वज काढण्याची वेळ येत आहे. वार्‍याचा फटका बसला की शिलाई उसविली जात आहे. त्यामुळे ध्वज फडकता ठेवण्यात अडचणी येत आहेत.

भक्ती-शक्ती प्रमुख भाग
पिंपरी-चिंचवड शहरातील मोठया प्रमाणात गर्दी जमणार्‍या प्रमुख भागांपैकी निगडीचा भक्ती-शक्ती चौक आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारित शिल्पसमूह पालिकेने या ठिकाणी उभारले आहे. पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार मानल्या जाणार्‍या या उद्यान परिसरात पालिकेने राष्ट्रध्वज असणारा सर्वाधिक उंचीचा झेंडा उभारण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंतचा सर्वात उंच म्हणजे 105 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज पंजाबमधील वाघा सीमेजवळ आहे. याशिवाय नवी मुंबई, कोल्हापूर, पुणे (कात्रज) आदी ठिकाणी असे राष्ट्रध्वज आहेत. त्याच धर्तीवर, पिंपरी महापालिकेनेही निगडीत राष्ट्रध्वज उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सुमारे अडीच कोटी खर्च करण्यात आले. 26 जानेवारी 2018 रोजी या राष्ट्रध्वजाचे अनावरण करण्यात आले होते. या राष्ट्रध्वजाच्या कापडाचे वजन जास्त आहे. त्यामुळे वार्‍याचा वेग आला की ध्वजाची शिलाई उसविली जाते. शिलाई उसवल्यामुळे आजपर्यंत आठ वेळा ध्वज उतरविण्यात आला होता, असे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

कायमस्वरूपी उपाय शोधणार
कार्यकारी अभियंता सतीश इंगळे म्हणाले की, या राष्ट्रध्वजाचे कापड 120-80 असून वजन 80 किलो आहे. त्यामुळे वार्‍याचा वेग आला की ध्वजाची शिलाई उसविली जाते. त्यामुळे ध्वज मजबूत देण्याची मागणी आम्ही केली आहे. त्यावर कायमस्वरुपी उपाय काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. उच्च प्रतिचा कपडा बनविणार्‍या एजन्सीकडे आम्ही संपर्क साधला आहे. ध्वजाच्या दुरुस्तीसाठी आजपर्यंत काही खर्च झाला नाही.