निगडीतील बूट आणि चपला चोरटा सीसीटीव्हीत कैद

0

 पिंपरी –  निगडीतील ब्रँडेड बूट आणि चपला व वेगवेगळ्या जातीचे श्वान (कुत्रे) चोरी करणारा चोर निगडी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. नेहमी मोठे गुन्हे उघड करणारे पोलीस या भुरट्या चोरामुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे निगडी पोलिसांना मोठे गुन्हेगार सोडून भुरट्या चोराचा पाठलाग करावा लागतो आहे. पोलिसांनी गस्त वाढवली असून काही दिवसात त्याला जेरबंद करू असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिले आहे. दरम्यान, बूट आणि चपला चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून उच्चभ्रू नागरिक राहत असलेल्या निगडी भागात ब्रॅण्डेड बूट आणि चपला चोरी गेल्याच्या तक्रारी निगडी पोलिसात आल्या आहेत. बंगल्यात दरवाजाच्या शेजारी असलेल्या चपलांच्या स्टँडमधून हा चोर ब्रँडेड कंपनीचे बूट आणि चपला चोरतो. या सगळ्या घटना पहाटे तीन ते चारच्या सुमारास घडत आहेत. त्यामुळे उच्चभ्रू असलेल्या वसाहतीतील नागरिकांनी निगडी पोलीस ठाणे गाठत तक्रारींचा पाढा वाचला. तेव्हा काही नागरिकांनी श्वान (कुत्रा) चोरीला गेल्याचे सांगितले, एवढेच नाहीतर चोर हा समोरच्या व्यक्तीकडून हवे असलेल्या कुत्र्यांची ऑर्डर मागवतो आणि नंतर श्वान (कुत्रा) चोरी करत असल्याचे नागरिकांनी पोलिसांना सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निगडीमधल्या एका विद्यमान नगरसेवकाच्या इमारतीतून चपला आणि बूट चोरीला गेले होते. हे सर्व पाहता निगडी पोलिसांना मात्र गुन्हेगार, सराईत आरोपी, सोडून भुरट्या चोराच्या मागे लागण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी देखील आप-आपल्या घराच्या आसपास लक्ष ठेवले पाहिजे. इमारत, बंगला असेल तर सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे असेही पोलिसांनी म्हटले आहे.