झाडाची मुळे 18 फूट लांब वाढून खाली रस्त्यापर्यंत आली मुळे
पर्यावरण संवर्धन समितीच्या सदस्यांच्या सतर्कतेमुळे वाचले झाड
निगडी : सर्वच झाडे आपल्याला ऑक्सिजन देत असतात. त्यामुळे सर्वच झाडे आपल्याला प्रिय असली पाहिजेत. पण असे होत नाही. छान फुले देणार्या झाडांना खुप प्रेम मिळते. त्यांना जास्त जपले जाते. तसेच आवर्जुन त्यांचे रोपणही केले जाते. मात्र काही झाडे ही दुर्दैवी असतात. या झाडांच्या तुलनेत त्यांना जास्त प्रेम, कौतुक मिळत नाही. अशाच काही झाडांपैकी एक म्हणजे वडाचे झाड असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही झाडे कुठेही उगवतात. इमारतीच्या कोपर्यांवर, पुलांवर कोठेही ही येतात. त्यासाठी कोणतेही विशेष देखभालीची गरज नसते. मात्र पुढील धोका ओळखून हे वडाचे झाड काढून टाकण्याचा, तोडण्याचा पर्याय लोकांकडून वापरला जातो. असेच एक झाड निगडीच्या पवळे पुलावर उगवले होते. या झाडाची मुळे 18 फूट लांब वाढून खाली रस्त्यापर्यंत येऊन ठेपली होती. यामुळे पुलाला धोका निर्माण होण्याची भीती होती. ही बाब पर्यावरण संवर्धन समितीच्या सदस्यांच्या ध्यानात आली. इसीए अध्यक्ष विकास पाटील आणि उद्यान विभागातील कर्मचार्यांनी हे झाड काढून झाडाचा जीव वाचवला आणि पुलाला निर्माण होणारा धोका टाळला.
हे देखील वाचा
पुलास धोका निर्माण झाला
इसीए अध्यक्ष विकास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार निगडी येथील पुलावर झाड उगवले असल्याची माहिती सदस्यांकडून समजली होती. या झाडाची वाढ झपाट्याने होत असते. मात्र 18 फुट मुळे वाढण्यासाठी कमीत कमी तीन वर्ष लागतात. मुळे 18 फूट लांब वाढून लोंबत रस्त्यावर येऊन पोहचली होती. त्यामुळे पुलासाठी हा मोठा धोका निर्माण झाला असता. या झाडामुळे धोका निर्माण होईल, म्हणून तशी तक्रार महापालिका उद्यान विभागास देण्यात आली. ते झाड त्वरित अलगत काढून घेवून त्या झाडाचा जीव वाचविला आणि जीवदान तर दिलेच त्याबरोबर मधुकरराव पवळे पुलाचे आयुष्य पण अबाधित ठेवण्यात आले.
पावसाळ्यात करणार रोपण
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातील पर्यवेक्षक चंद्रकात गावडे आणि बीव्हीजी पर्यवेक्षक संभाजी नांदेडे यांनी त्वरित कारवाई करून अगदी धोकेदायक ठिकाणी वाढलेले वडाचे झाड काढले. झाड काढताना ते दुसरीकडे लावता येईल याची पूर्ण काळजी घेण्यात आली. पर्यावरण प्रेमी विकास पाटील यांनी हे झाड दत्तक घेतले आहे. या झाडाची मुळे 18 फुट लांब असली तरी खोड फक्त एक फुट उंच आहे. या झाडाला पुढच्या पावसाळ्यात महापालिका मध्यवर्ती ई-कचरा संकलन केंद्राच्या आवारात समारंभपूर्वक लावण्यात येईल.