13 लाखांची रोकड जप्त, टोळीत एका मुलीचाही सहभाग
चेकमेट कंपनीचा पूर्वीचा कामगार मुख्य सूत्रधार
पिंपरी : निगडीतील यमुनानगरमध्ये कॅशव्हॅन कर्मचार्यावर हल्ला करून 25 लाख लुटणार्या टोळीतील चौघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 13 लाख 52 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर, चेकमेट कॅशव्हॅन कंपनीकडे पूर्वी कामाला असलेला कर्मचारीच या लुटमारीचा मुख्य सूत्रधार आहे. राहुल संग्राम वाघमारे (22, सरदार मुरकुटे चाळ, बाणेर), महादेव लिंबाजी खापरे (23, रा. राजाभाऊ लोखंडे चाळ, बाणेर), सागर उर्फ बाळा रामचंद्र खताळ (21, जनवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर, पूजा चव्हाण (रा. ससाणेनगर, हडपसर) या मुलीचाही गुन्ह्यात समावेश आहे. राहुल वाघमारे हा चेकमेट कंपनीमध्ये आधी कामगार होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुनानगर एलआयसी कार्यालयाजवळ 3 मे रोजी दुपारी चार जणांनी कॅशव्हॅन कर्मचार्यांवर हल्ला चढविला. त्यांच्याकडील रोख 25 लाख 61 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले होते. या प्रकरणाचा तपास करताना चेकमेट कंपनीचा पूर्वीचा कामगार राहुल वाघमारे यांनी मित्रांच्या मदतीने ही लूटमार केल्याचे पोलिसांना समजले. त्याप्रमाणे राहुल याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर महादेव, सागर, पूजा आणि एक अल्पवयीन मुलगा यांनी मिळून हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत 13 लाख 52 हजार 650 रुपये रोख , 34 हजारांचे दोन मोबाईल, दोन दुचाकी, एसा एकूण 15 लाख 16 हजार 650 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पुन्हा लूटमार करण्याचे धाडस
यापूर्वी कोंढवा येथे कॅश लुटल्याचा बनाव राहुल याने केला होता. त्यावेळी गुन्ह्यात न अडकल्यामुळे मित्रांच्या मदतीने पुन्हा लूटमार करण्याचे धाडस केले. त्याला कॅशव्हॅन व एलआयसीच्या रकमेची माहिती असल्याने ठरवून हा गुन्हा केल्याचेही पोलिस तपासात समोर आले. गुन्हे शाखा युनिट 4 चे सहायक पोलिस निरीक्षक गणेश पाटील, पोलिस कर्मचारी दिलीप लोखंडे, प्रमोद वेताळ, राजेश परंडवाल, राजु मचे, धर्मराज आवटे, जितेंद्र अभंगराव, संजय गवारे, प्रमोद लांडे, राजेंद्र शेटे, प्रविण दळे, आप्पासाहेब कारकुड, कैलास बोबडे, अमित गायकवाड, संतोष बर्गे, गणेश काळे, हेमंत खरात, सुनिल चौधरी, सरेंद्र आढाव, प्रमोद हिरळकर, स्वप्निल शिंदे, गोपाल ब्राम्हदे यांनी ही कारवाई केली.