निगडीत भरदिवसा अडीच लाखांची घरफोडी

0

निगडी : दरवाजाचा कुलूप-कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात घुसून शयनगृहातील कपाटातील दोन लाखांची रोकड आणि सोने-चांदीचे दागिने, घड्याळ, असा एकूण दोन लाख 61 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 27) सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान निगडी, प्राधिकरण येथे घडली. याप्रकरणी विलास कुटे (वय 55, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा उच्चभ्रू वस्तीत चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुलूप-कोयंडा उचकटला
विलास कुटे पेशाने वकील आहेत. गुरुवारी सकाळी अकरा वाजता घर बंद करून ते बाहेर गेले होते. सकाळी अकरा ते सायंकाळी पाचच्या दरम्यान दरवाजाचा कुलूप-कोयंडा उचकटून चोरटे घरात घुसले. शयनगृहातील कपाटातील दोन लाखांची रोकड आणि सोने, चांदीचे दागिने, घड्याळ असा एकूण दोन लाख 61 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कुटे घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. निगडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. ए. अहिरे तपास करत आहेत.