पुणे – शॉक लागल्यामुळे जीव गमविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशीच एक घटना पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथे घडली. रस्त्यावरून जात असताना विजेच्या खांबाचा शॉक लागून एका ९ वर्षीय बालकाचा मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. हरीओम विनायक नराल (वय ९) असे मृत बालकाचे नाव आहे .वीजचोरीतून हा प्रकार घडला असल्याची शक्यता महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी व्यक्त केली.
हरिओम हा ओटा स्कीम येथील अंकुश चौकातून रस्त्याने पायी चालला होता. तो विजेच्या खांबाजवळून जात असताना त्यास विजेचा जोरदार झटका लागल्याने तो बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान महापालिका अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणचा विद्युत प्रवाह खंडित केला आहे. मात्र त्यानंतरही या ठिकाणी विद्युत प्रवाह येत असल्याचे दिसले. यामुळेच हा प्रकार वीजचोरीतून झाला असल्याचे समोर आले.