चिखली : वाहतुकीची होणारी गैरसोय लक्षात घेता, निगडी ते दापोडी या रस्त्यावर महापालिका प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेला बीआरटीएस मार्ग सोमवार (दि. 20) पासून दुचाकींसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून सोमवारी अनेक दुचाकी धावताना पाहावयास मिळाल्या. दरम्यान, प्रशासनाने योग्य नियोजन करून आता बहुप्रतिक्षीत बीआरटी बससेवादेखील या मार्गावरून सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. निगडी ते दापोडी बीआरटीएस मार्ग हा गेल्या तीन वर्षांपासून बांधून पूर्ण झाला असला तरी या मार्गावरील बस थांब्याची दुरवस्था तसेच मार्ग बांधणीचा अंदाज चुकणे आदी अडचणीमुळे या मार्गावरील बस सेवा आतापर्यंत रखडली आहे. शहराच्या प्रमुख मार्गावर असणार्या बीआरटीएस सेवेचा रस्ता तयार असूनही त्याचा वापर होत नसल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांनी याप्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांनी बीआरटी रस्ता सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या शिफारसीनंतर हा मार्ग सोमवारपासून दुचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.
नियोजनाचा अभाव
निगडी ते दापोडी या मार्गावरून दुचाकीच नाही तर बीआरटीएस बससेवा सुरू करावी, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचतर्फे करण्यात आली आहे. निगडी ते दापोडी हा मार्ग गेल्या तीन वर्षांपासून तयार आहे. मात्र, नियोजनाचा अभाव, दुरुस्तीची कामे यामुळे तो रखडला आहे. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळताच बीआरटी सेवा डिसेंबर 2016 ला चालू करू, असे आश्वासन दिले होते. परंतु या मार्गाच्या फाईल वेळीच पुढे न सरकणे, राजकीय विरोध अशा अनेक बाबींमुळे हा मार्ग तयार असूनही वाहतुकीच्या प्रतीक्षेत आहे.
निर्णयावर टीका
प्रशासनाच्या निर्णयामुळे वाहतुकीच्या समस्येत भरच पडणार आहे. स्वतंत्र, जलद व सुरक्षित मार्ग दिल्याने रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. निर्दोष, सुरक्षित, त्रुटीरहित बीआरटी (दापोडी-निगडी) मार्ग सुरू करण्याऐवजी, खासगी वाहन वापरास प्रोत्साहन देणार्या केंद्रीय निधीतून 6-7 वर्षे तयार असलेला बीआरटी मार्ग दुचाकींसाठी खुला करण्याचा निर्णय आत्मघातकी असल्याची टीका पीएमपी प्रवासी मंचने केली आहे. पुण्यातील नगर रोडवरील बीआरटीचा अनुभव अत्यंत विदारक आहे. 3 ते 4 वर्ष हा मार्ग विनावापर पडून होता. तेव्हा स्थानिक नेत्यांनी व नागरिकांनी या मार्गाची मोडतोड केली. त्यानंतर बीआरटी सुरू केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यानंतर मार्ग सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून तेथे अपघातांची मालिका सुरूच आहे. एक वर्षानंतरही अपेक्षित सक्षमता व प्रवासांची सुरक्षितता साध्य करता आली नाही. हे उदाहरण ताजे असतानाच दापोडी-निगडी या मार्गावर वेगळे काय घडणार आहे? असा सवाल मंचने उपस्थित केला आहे.
खासगी वाहतूक नको
2009-2010 या वर्षात जेएनएनयूआरएमतर्फे पुणे व पिंपरी-चिंचवडसाठी बीआरटी व 650 बसेस मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाने सुमारे 500 कोटी दिले. पुढील 2-3 वर्षात शेकडो कोटी खर्चून, दापोडी ते निगडी बीआरटीचा मार्ग उभारला. 36 बस थांबे उभारण्यात आले. इतका सर्व खर्च केला असताना त्याठिकाणी बीआरटी वाहतूक सुरू करणे गरजेचे असताना त्याऐवजी खासगी वाहनांना प्रोत्साहन देण्याचे काम या माध्यमातून होत असल्याचे पीएमपी प्रवासी मंचने म्हटले आहे.