पुणे: नुकत्याच बांधलेल्या निगडे बुद्रुक (ता.वेल्हे) येथील पाझर तलाव काम पूर्ण न होताच अडविले. त्यामुळे पाझर तलावाचा भराव वाहून गेल्याची घटना दि. 22 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली. यामध्ये येथील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि अधिकार्यांची चौकशी करून, दोषींवर कारवाई करू असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी सांगितले.
पाझर तलाव बांधणीचे काम प्रगतीपथावर होते. या पाझर तलावाच्या कामास जानेवारी 2017मध्ये सुरुवात झाली होती. जूनअखेर 60 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु पावसाळा हंगाम सुरू झाल्यानंतर उर्वरित काम पूर्ण करता आले नाही. पाझर तलाव क्षेत्रात मागील आठवडाभरापासून सातत्याने पाऊस पडत असल्याने तसेच मागील दोन दिवसांत तर अतिवृष्टीमुळे या पाझर तलावाच्या डाव्या बाजूस घळ पडून फुटला.
वेल्हे तालुक्यात गेल्या आठवड्यापासुन जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व नद्या ओढ्यांना पुर आला असून, तालुक्यातील निगडे बुद्रुक येथील वाघजाई मंदिराजवळ जिल्हा परीषदेच्या माध्यमातून छोटे पाटबंधारे विभागाकडून 89 लाख 28 हजार 533 रुपये खर्च करून पाझर तलाव बांधण्यात येत आहे. या तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. कामासाठी मुरुमांचा वापर केला, तर पाझर तलावासाठी सांडवा ठेवण्यात आला होता. परंतु या सांडव्याची उंची जास्त असल्याने तलाव भरल्यानंतर जाऊ शकले नाही. त्यामुळे तलावाच्या डाव्या बाजूंनी फुटला. ही घटना 22 जुलैला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना रात्रीच्या वेळी घडली असल्याने शेतात एकही शेतकरी नसल्याने मोठी दुर्घटना टळली, कोणतीही जिवितहानी झाली नाही. परंतु पाझर तलावाच्या खाली असलेल्या शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या परिसरात सध्या पाऊस सुरू असल्याने शेतकर्यांनी भातलावणी केलेली आहे.
नुकसानभरपाईची मागणी
देवकाते यांनी या घटनास्थळास रविवारी भेट देऊन पाहणी केली. पाझर तलावाच्या खालील बाजूस भात शेतीचे व विहिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.