निजामपूर। धुळे जिल्ह्यांतील साक्री तालुक्यातील निजामपुर येथील वयोवृद्ध विधवा महिला मंगलाबाई उत्तम शिनदे यांनी त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंर्गत घरकुल मिळावे यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जुलै महिन्यात पत्र तथा विनंती अर्ज पाठविला होता. याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयातील सेक्शन ऑफीसर अलोक सुमन यांनी राज्याचे मुख्यसचिव यांना नुकतेच पत्र देवून पुढील कारवाई करण्याचे कळविले आहे.
या पत्राची दखल घेतल्याने मंगलाबाई शिनदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. मंगलाबाई शिनदे ह्या भूमिहीन असून त्यांचा दारिद्रयरेषेखालील यादीत समावेश आहे. त्या दुसर्यांच्या घरी धुणीभांडी करून आपला उदारनिर्वाह करीत आहेत. मंगलाबाई ह्या विधवा असून त्या त्यांच्या कुटूंबियांसोबत 150 वर्षांपेक्षा जुन्या घरात राहत आहेत. पावसाळ्यात हे घर कोसळण्याची शक्यताही त्यांनी पत्रात नमुद केली होती. तसेच घरकुल मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, साक्री गट विकास अधिकार्यांकडे वारंवार विनंतीअर्ज करूनही त्याची दखल घेतली गेली नव्हती.