मुंबई । कोपर्डी घटनेत दाखवलेली तत्परता नितीन आगे प्रकरणात सरकारने दाखवली नाही, याबाबत माजी खासदार व माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे राज्याची दांभिकता उघड होत असून स्वत:ला पुरोगामी म्हणवण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही मुणगेकर यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कोपर्डीचे निमित्त करून अॅट्रोसिटी रद्द करण्याची मागणी मराठा समाजाने केल्याचा आरोप मुणगेकर यांनी केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष सुटल्यानंतर आता आवाज उठण्यास सुरुवात झाली आहे. नितीन आगेच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी 1 जानेवारीपासून राज्यभर भव्य आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देखील मुणगेकर यांनी दिला आहे. दुर्दैवाने नितीन आगेप्रकरणी असे मोर्चे निघाले नाही. त्यामुळे सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही असे मुणगेकर यांनी म्हटले आहे.