मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे या युवकाच्या धक्कादायक हत्येप्रकरणी 13 साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील 9 आरोपी निर्दोष सुटले. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. फितूर साक्षीदारांवर कारवाई व्हावी, यासाठी सरकार आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ही घोषणा केली.
खर्डा, ता. कर्जत, जि. अहमदनगर येथील नितीन आगे या 17 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील 9 संशयितांची अहमदनगर न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली. खटल्यातील 26 पैकी 13 साक्षीदार फितूर झाल्याने सबळ पुराव्याअभावी हे आरोपी निर्दोष सुटले. नितीन आगे प्रकरणावर राज्यभरात सध्या तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नितीनचे वडिल राजू आगे यांनी सोमवार, दि. 4 डिसेंबर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत तेराही फितूर साक्षीदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही सांगितले. त्याबाबतचा पोलिसांचा प्रस्तावही विधी व न्याय विभागाकडून सादर करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.