पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेवर प्रथमच सत्ता काबीज केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नितीन काळजे यांची महापौरपदी तर याच पक्षाच्या शैलजा मोरे यांची उपमहापौरपदी मंगळवारी (दि. 14) बिनविरोध निवड झाली. काळजे हे महापालिकेतील भाजपचे पहिलेच तसेच पहिले अविवाहित महापौर ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेतली. निवडीनंतर काळजे आणि मोरे यांच्या समर्थकांनी ढोलताशांच्या निनादात जल्लोष केला. महापालिका निवडणुकीत 128 पैकी सर्वाधिक 77 जागा जिंकून भाजप सत्तेचा दावेदार ठरला. भाजपने अन्य कोणत्याही पक्षाची साथ न घेता सत्ता काबीज केली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका सभागृहात महापौर व उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. महापौरपदासाठी भाजपने मोशी-चर्होली प्रभागाचे नगरसेवक नितीन काळजे यांना तर उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांना संधी दिली होती. राष्ट्रवादीने महापौरपदासाठी श्याम लांडे तर उपमहापौरपदासाठी निकिता कदम यांची उमेदवारी दाखल केली होती. मात्र, त्यांनी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडीनंतर सभागृहात भाजपच्या सदस्यांनी बाके वाजवून व जयजयकाराच्या घोषणा देत जल्लोष केला. प्रेक्षक गॅलरीतही भाजपचे कार्यकर्ते व समर्थकांनी घोषणा देत विजयाचा आनंद व्यक्त केला. तर दुसरीकडे सभागृहाबाहेरही ढोलताशांच्या निनादात गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला गेला. पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेत धाव घेऊन नूतन महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन केले.
बैलगाडीतून गेले महापालिकेत!
नितीन काळजे हे महापालिकेचे 24 वे महापौर ठरले. नव्याने समाविष्ट केलेल्या गावांनाही त्यांच्या रुपाने प्रथमच महापौरपद मिळाले आहे. सकाळी भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी पिंपरी-चिंचवडचे दैवत मानल्या जाणार्या संत मोरया गोसावी यांचे दर्शन घतले. यावेळी सर्वांनी केशरी फेटे घालून महिला नगरसेवकांनीही हिरव्या रंगाच्या साड्या व फेटे घालून महापालिकेत प्रवेश केला. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, नगरसेवक नामदेव ढाके, राहुल जाधव यांनी बैलगाडीमध्ये बसून महापालिकेत प्रवेश केला. निवड प्रक्रियेवेळी सभागृहात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे नगरसेवकांसह अपक्ष नगरसेवकही हजर होते. यावेळी राष्ट्रवादीतर्फे महापौर पदासाठी अर्ज भरलेल्या श्याम लांडे यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. मावळत्या महापौर शकुंतला धराडे यांनी महापौरपदाची सर्व सूत्रे यावेळी नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांच्याकडे सोपवली. पदभार स्वीकारल्यानंतर महापौर काळजे यांनी सर्वसाधारण सभा 23 मार्चरोजी दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केली. त्यानंतर महापौर काळजे व उपमहापौर मोरे यांची बैलगाडीतून मिरवणूक काढत, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. स्थायी समितीसह इतर समित्यांची निवड आता 23 तारखेला होणार आहे.
नवनिर्वाचित महापौर, उपमहापौरांचा सत्कार
नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलेजा मोरे यांचा सत्कार पीठासीन अधिकारी दौलत देसाई आणि पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केला. तसेच पालकमंत्री गिरीश बापट, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप आदींनीदेखील त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात हा क्षण लिहिला जावा. कारण पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार महापौरपदावर विराजमान झाला आहे. निवडणुकीनंतर आता शहराच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालिकेचा आदर्श कारभार राज्याला दाखवून देऊ असेही त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम, उर्मिला काळभोर, नगरसेविका अर्पणा डोके यांनी काळजे आणि मोरे यांना शुभेच्छा दिल्या.
शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला महापौर होण्याचा मान
पत्रकार परिषदेत बोलताना महापौर काळजे म्हणाले की, माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचा पहिला महापौर होण्याचा मान आमदार महेश लांडगे यांच्यामुळे मिळाला आहे. शहर भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करून पारदर्शी कारभार करणार आहे. शहराच्या विकासाबरोबर सामाविष्ट गावांच्या विकासावर भर देणार असल्यांचे त्यांनी सांगितले. गेल्या 20 वर्षांपासून समाविष्ट गावांना पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले. मात्र आमदार महेश लांडगे यांनी विधानसभा निवडणुकीत समाविष्ट गावांना न्याय मिळवून देणार असा शब्द दिला होता. त्यावेळी चर्होली, मोशी, दिघी, चिखली आणि तळवडे आदी परिसरातील नागरिकांनी आमदार लांडगे यांच्यावर विश्वास दाखवला तो शब्द त्यांनी खरा करून दाखवला. त्यामुळे आज मला महापौरपदाची मिळालेली संधी म्हणजे समाविष्ट गावांचा सन्मान आहे.
कारकिर्दीतील कामांचा अजेंडा..
कारकिर्दीत कोणती कामे करणार याचा अजेंडाही यावेळी सादर केला. ज्यामध्ये शास्तीकर माफ करणे, ज्यांनी भरली आहे त्यांची शास्ती पुढील बिलात समाविष्ट करणे, शहराला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळवून देणे तसेच स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठी प्रयत्न करणार, 24 तास पाणीपुरवठ्यासाठी भामा आसखेडवरुन पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार, मेट्रो निगडीपर्यंत यावी यासाठी प्रयत्न करणार, चर्होली, मोशी कचरा डेपोसाठी उपाययोजना करणार, कत्तलखाना प्रश्न मार्गी लावणार, सारथी अधिक प्रभावशाली करणार, महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधणार अशी आश्वासने त्यांनी महापौर कार्यक्रम पत्रिकेतून जाहीर केली.
भ्रष्टाचाराचे पाणी कुठे मुरते ते शोधणार!
महापालिकेत जे भ्रष्टाचार झाले आहेत. त्यांची कसून चौकशी केली जाईल. या भ्रष्टाचाराचे पाणी नेमके कुठे मुरते आहे याचा शोध मी लावणार आहे. तसेच भाजपच्या काळात पूर्णपणे पारदर्शी कामकाज केले जाईल. मी पैसा खाणार नाही खाऊ देणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.