पुणे । पुण्याच्या नितीन कीर्तनेने वरिष्ठ गटाच्या उत्तराखंड ओपन (ग्रेड 4) आयटीएफ मानांकन टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवला. त्याने 35 वर्षांखालील गटातील एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपद पटकावले. शांती टेनिस अॅकेडमी आणि उत्तराखंड टेनिस असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा नुकतीच डेहराडून येथे आयोजित करण्यात आली होती. 35 वर्षांखालील गटाच्या पुरुष एकेरीत नितीनने चेन्नईच्या विजय कन्ननचा 6-4, 7-5 असा पराभव केला आणि विजेतेपद मिळवले. नितीन आणि विजय हे दोन्ही माजी राष्ट्रीय विजेते आहेत. त्यामुळे दोघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित होती. पहिल्या सेटमध्ये दोन्ही संघांनी सुरुवातीला तोडीस तोड खेळ केला. एक वेळ विजय 4-3ने आघाडीवर होता. यानंतर नितीनने दोन वेळा विजयची सर्व्हिस रोखली आणि पहिला सेट जिंकला. दुसर्या सेटमध्येही विजय 3-2ने आघाडीवर होता.
यानंतर नितीनने पुन्हा एकदा पिछाडी भरून काढली आणि हा सेट 7-5 असा जिंकून बाजी मारली. नितीनचे हे वरिष्ठ गटातील पहिलेच आयटीएफ स्पर्धेचे विजेतेपद ठरले. यानंतर नितीनने विजयच्या साथीने खेळताना दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रदीप शर्मा आणि नरेंद्र चौधरी जोडीवर 6-2, 6-3 अशी सहज मात करून विजेतेपद पटकावले. नितीनला एकेरीत 10 हजार 400 रुपये, पदक आणि स्मृतिचिन्ह, तर दुहेरीत 2 हजार 500 रुपये, पदक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.