नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यायाने भाजपच्या विजयी झंझावाताला रोखण्यासाठी संयुक्त जनता दलाने (जेडीयू) आतापासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या व्यूहरचनेचा एक भाग म्हणून 2019 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलाने (जेडीयू) बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी मोदींप्रमाणेच विकासपुरुष अशी नितीश कुमार यांची प्रतिमा निर्माण करण्यासाठी पद्धतशीर पावले उचलण्यास सुरुवातही केली आहे. दरम्यान, हा प्रयोग किती यशस्वी होतो याबाबत उत्सुकता आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यासाठी भाजपने 2012पासूनच पावले टाकण्यास सुरुवात केली होती. गुजरातचा विकासपुरुष अशी मोदींची प्रतिमा बनवण्यास भाजप यशस्वी बनला. त्याचा भाजपला फायदाही झाला. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारा नेता अशी प्रतिमा बनवण्यासाठी नितीशकुमार समर्थकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
दरम्यान, भाजपच्या विजयरथाला रोखण्या इतकी ताकद काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे हे आव्हान स्वीकारण्यासाठी केंद्रीय पातळीवर तिसर्या आघाडी उभारण्याच्या पर्यायाची चाचपणी अनेकदा झाली आहे. मात्र, तिसर्या आघाडीचे नेतृत्व कोणी करावे याबाबत कधीच एकमत झाले नाही. तिसर्या आघाडीच्या नेतृत्वासाठी शरद पवार, सपाचे मुलायमसिंह यादव, बसपच्या मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता, जदचे लालूप्रसाद यादव, डाव्या पक्षांचे नेते आणि जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे नेहमीच आघाडीवर होती.
सात जन्मात पंतप्रधान होणार नाहीत
पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नितीशकुमार यांचे नाव पुढे करण्याचे प्रयत्न जेडीयूकडून होत असताना बिहारमधील भाजपच्या नेत्यांनी त्यांना अपशकून करण्यास सुरुवात केली आहे. सात जन्मात नितीश देशाचे पंतप्रधान बनू शकणार नाही, असा चिमटा राज्यातील विरोधी पक्शनेते प्रेमकुमार यांनी काढला आहे. प्रेमकुमार यांच्या या वक्तव्यानंतर बिहारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बिहार विधानसभेच्या कामकाजास सुरुवात होताच भाजपच्या आमदारांनी प्रश्नोत्तराच्या तासात सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी शिक्षकांवर केलेला लाठीहल्ला आणि जेडीयूचे आमदार मेवालाल चौधरी यांना अटक करण्याच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार सभागृहात हंगामा करत आले आहेत.
नितीश, ममता ठरू शकतात पर्याय
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांच्याशिवाय तिसर्या आघाडीसाठी कोणत्याही राष्ट्रीय अथवा प्रादेशिक पक्षाकडे पर्याय नाही. त्यामुळे याच राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्याच्या विचारात जेडीयू आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त जनता दलाने राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून नितीशकुमार यांना प्रोजेक्ट करायला सुरूवात केली असून, नितीशकुमार यांचा चेहरा आणि नेतृत्त्व सर्व स्तरातून स्वीकारले जाणार असल्याने त्यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वपक्षीयांनी एकत्र यावे, असे आवाहन संयुक्त जनता दलाने केले आहे. नितीश कुमार हे दूरदृष्टी असलेले आणि विकास पुरुष असल्याने त्यांना देशातील जनता पंतप्रधान म्हणून स्वीकारेल, असे संयुक्त जनता दलाच्या प्रवक्त्या भारती मेहता यांनी म्हटले आहे.