पाटणा/नवी दिल्ली । बिहारमध्ये भाजपची सोबत करणारे नितीशकुमार यांनी अपेक्षेप्रमाणे केंद्रातही भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शनिवारी संयुक्त जनता दलाच्या पाटणा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून जेडीयू आता केंद्रीय मंत्रीमंडळात सहभागी होणार आहे. यामुळे भाजपला एक मातब्बर साथीदार मिळाला आहे. तर दुसरीकडे जेडीयुचे वरिष्ठ नेते शरद यादव यांनी आपला विरोध कायम ठेवला. त्यांच्या वारंवार बदलत्या भूमिकेला यादव यांनी प्रारंभापासूनच विरोध दर्शविला होता दरम्यान नितीशकुमार यांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
बहुमताने निर्णय
शनिवारी पाटणा येथे संयुक्त जनता दलाच्या कार्यालयात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पक्षाध्यक्ष नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत एनडीएत सामील होण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता जदयूच्या एनडीए प्रवेशावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले. काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नितीश कुमारांची भेट घेतल्यानंतर जदयूला एनडीएत सामील होण्याचे निमंत्रण दिले होते. यावर शनिवारी पक्षाने बहुमताने निर्णय घेत शिक्कामोर्तब केले.
शरद यादव आक्रमक
तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या निर्णयाला पहिल्यापासून विरोध करणार्या शरद यादव यांनी शनिवारीदेखील त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नितीशकुमारांनी बिहारच्या जनतेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. ‘जनता दल यूनायटेड’ स्थापन करण्यात माझा सिंहाचा वाटा आहे आणि आता नितीशकुमारांचे समर्थक म्हणतात हा पक्षच माझा नाही, या वक्तव्यावर त्यांनी टीका करत आपली पक्षातून हकालपट्टी करून दाखवाच असे खुले आव्हान दिले. दरम्यान, शरद यादव आणि राजद समर्थकांनी आज मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी नितीशकुमार समर्थक आणि शरद यादव समर्थक यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांना येऊन सगळी परिस्थिती आटोक्यात आणावी लागली.
सत्तेत सहभाग?
बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू हे एकत्रीतपणे सत्तेत आहेत. आता जेडीयूने राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता या पक्षाचे मंत्री कोण बनणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.