पटणा । काल सायंकाळी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे नितीश कुमार अवघ्या काही तासांमध्ये पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. अर्थात आधी काँग्रेस व राष्ट्रीय दलासोबत सत्ता उपभोगणार्या नितीश यांनी आता भारतीय जनता पक्षाची साथ घेतली आहे. त्यांच्या या ‘घरवापसी’मुळे भाजप बिहारमध्ये जवळपास दोन वर्षांनी सत्तेत सहभागी झाली आहे. दरम्यान, नितीश यांचा हा पवित्रा देशाच्या राजकारणात प्रचंड खळबळजनक ठरला असून याचे व्यापक पडसाद उमटले आहे. लालूप्रसाद यादव आणि राहूल गांधी यांच्यासह राजद व काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले असून दुसरीकडे भाजपने मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे आता केंद्रातही संयुक्त जनता दल सत्तेत सहभागी होणार असून येत्या काही दिवसांमध्ये या पक्षाचे मंत्री आपापल्या पदांची शपथ घेतील असे मानले जात आहे.
रात्रभर नाट्यमय घटना
बुधवारी सायंकाळी नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जदयू आणि भाजप नेत्यांची प्रदीर्घ बैठक झाली. यानंतर रात्री दहाच्या सुमारास माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी आपला पक्ष नितीश कुमार यांना पाठींबा देणार असल्याचे घोषीत केले. तर मध्यरात्री नितीशकुमार यांनी राज्यपालांना आपल्याला असणार्या पाठींब्याचे पत्र देत सरकार स्थापन करण्याचा दावा केला. यामुळे तेजस्वी यादव यांनी पटणा येथील राजभवनावर आपल्या समर्थकांसह मोर्चा काढला. त्यांनी बराच वेळा ठिय्यादेखील मांडला. सकाळी पावणेचार वाजेच्या सुमारास हे नाट्य संपले.
जोरदार टीकास्त्र
नितीशकुमार यांच्या आकस्मिक निर्णयाने राजद आणि काँग्रेसला जोरदार हादरा बसला आहे. रात्री तेजस्वी यादव यांनी नितीश यांच्या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडल्यानंतर दिवसा लालू, राहूल यांच्यासह या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हे सगळे कधीपासूनच शिजल्याची आपल्याला माहिती असल्याचे सांगत राहूल गांधी यांनी नितीश यांच्यावर टीका केली. तर लालूंनी अपेक्षेप्रमाणे शेलक्या भाषेत त्यांना झोडपून काढले. नितीश हे भस्मासूर असल्याचा सांगत लालूंनी त्यांच्यावर खुनाचा आरोप असतांनाही ते मुख्यमंत्रीपदी कसे ? असा सवाल केला. त्यांनी संघमुक्त बिहारचा नारा दिला होता. मात्र भाजपची साथ धरून त्यांनी विश्वासघात केल्याचा आरोप लालूंनी केला. तर दिग्वीजय सिंग, मायावती, अखिलेश यादव या नेत्यांनीही नितीश कुमार यांच्या निर्णयावर टीका केली.
सकाळी शपथविधी
बिहारची राजधानी पाटणा येथील राजभवनात गुरूवारी सकाळी पार पडलेल्या शपथविधी समारंभात नितीशकुमार यांच्यापाठोपाठ सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची, तर सुशीलकुमार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. नितीशकुमार हे सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यांनी शपथ घेतल्यानंतर राजभवनात त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
जेडीयूमध्ये फूट?
दरम्यान, नितीश कुमार यांच्या ‘मास्टर स्ट्रोक’ने सर्वजण हैराण झाले असतांना त्यांच्या संयुक्त जनता दल या पक्षात मात्र अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे. विशेष करून ज्येष्ठ नेते शरद यादव यांना विचारात न घेता हा निर्णय घेण्यात आल्यामुळे ते नाराज असून त्यांनी शुक्रवारी सकाळी दिल्लीत राहूल गांधी यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. तर पक्षाचे राज्यसभेचे सदस्य अन्वरअली यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे आता जेडीयूमध्ये फूट पडणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.