मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमार विराजमान होणार हे स्पष्ट आहे. मात्र नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षापेक्षा भाजपने अधिक जागा मिळविल्या आहेत, यावरून भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचीही चर्चा होती. मात्र यावर भाजप नेत्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने निवडणूक लढविली असल्याने नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वाधिक जागा मिळवून देखील भाजप कमी जागा असलेल्या नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पद देणार आहे. याचे श्रेय नितीश कुमार यांनी शिवसेनेला द्यायला हवे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला कमी जागा मिळाल्या म्हणून भाजपने मुख्यमंत्री पद दिले नाही, मात्र याचे उलट बिहारमध्ये नितीश कुमार कमी जागा आणून मुख्यमंत्री होणार असतील तर नितीश कुमार यांनी शिवसेनेला श्रेय द्यायला हवे असे विधान केले आहे.
भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करणार असल्याचे शब्द दिले असते तरी दबक्या आवाजात भाजपचा मुख्यमंत्री करण्याबाबतही चर्चा करतात. यावरून एनडीए आघाडी टिकेल का? अशी शंका ही उपस्थित केली आहे.