निती आयोगाच्या ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ परिषदेत अथांग जैन यांचा समावेश

0

परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी सुसंवाद

नवी दिल्ली । नीति आयोगाच्यावतीने दिल्ली येथे भारतातील 200 तरुण उद्योजकांसाठी ’चॅम्पियन्स ऑफ चेंज’ ही परिषद आयोजित करण्यात आली होती. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या 2022 मध्ये भारत कसा असावा या संकल्पनेत सॉफ्ट पॉवर, इंक्रेडिबल इंडिया, शिक्षण, मनुष्यबळ विकास, आरोग्य, डिजिटल इंडिया आणि नवीन भारत या विषयांवर चर्चेसाठी भारतातील तरुण उद्योजकांना निमंत्रित केले होते. यात जैन फार्मफ्रेश फुडस् लि. चे संचालक अथांग जैन यांना निमंत्रित करण्यात आले होते.

मान्यवरांची उपस्थिती
दिल्लीत 17 ऑगस्ट रोजी झालेल्या एका बैठकीत खासगी क्षेत्रात बदल घडवण्यासाठी काय करणे शक्य आहे या विषयावर विचारमंथन करण्यात आले. केंद्रीय मंत्री आणि सचिव देखील या बैठकीत उपस्थित होते. या चर्चेनंतर काही शिफारसींचा सारांश तयार करून तो पंतप्रधानांना सादर करण्यात आला. या प्रसंगी पंतप्रधान मोदींनी ’चॅम्पियन्स ऑफ चेंज’ मधील उद्योजकांना संबोधित केले. त्यांनी अशा उद्योजकांना भारताचे प्रगत भारतात रुपांतर करण्यासाठी कटिबद्ध रहायला सांगितले. या परिषदेत निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढीया तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत उपस्थित होते.

प्रभावी विचार मांडले.
जैन फार्मफ्रेश फुडस लिमीटेड चे संचालक अथांग जैन हे अनिल जैन यांचे सुपुत्र तर अशोक जैन यांचे पुतणे असून त्यांनी शेतीत बदल घडवून रुपांतर करणे, गरिबीचे निर्मूलन करणे असे प्रभावी विचार मांडले. शेतीतील मूल्यवर्धन करण्यावर जोर देऊन शेतकर्‍यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल याविषयी त्यांच्या कल्पना स्पष्ट केल्या. त्यांनी यावेळी केंद्रीय मंत्री अरूण जेटली, नितीन गडकरी, पीयुष गोयल आदी मान्यवरांशी संवाद साधला. अथांग जैन यांनी तरुण वयातच राष्ट्रीय स्तरावरच्या ध्येय-धोरणातील चर्चेत सामील होऊन त्यांचे कौशल्य व त्यांच्या परिपक्वतेचा परिचय दिला. या परिषदेतील त्यांचा समावेश हा जैन परिवारासह संपूर्ण जळगावसाठी एक अभिमानाचा क्षण म्हणता येईल. अथांग जैन हे सुप्रसिद्ध उद्योगपती भवरलालजी जैन यांचे नातू असून आपल्या आजोबांचे विचार व आदर्श ते पुढे नेत आहेत.