निधीअभावी प्रतिभा योजनेचेच आरोग्य धोक्यात!

0

पुणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्यावर्षी प्रतिभा आरोग्य संपन्न योजना राबवली होती. या योजनामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यांमध्ये सुधारणा झाली होती. ही योजना यशस्वी झाल्यानंतर सर्वस्तरातून कौतूक होत होते. मात्र, यावर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने सन 2017-18 च्या मुळ अंदाजपत्रकामध्ये प्रतिभा आरोग्य संपन्न योजनेला शुन्य तरतूद केल्यामुळे योजना विस्मृतीत गेली असून योजनेचेच आरोग्य बिघडल्याचे दिसत आहे.

महिलांसाठी संजीवनी ठरलेली योजना
जिल्हा परिषदेने महिलांना रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रतिभा आरोग्य संपन्न योजना राबविली होते. या योजनेसाठी 35 लाखांची तरतूद करण्यत आली होती. जिल्ह्यातील तीन हजार आशा कर्मचारी, 847 आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन 20 वर्षाच्या पुढील 11 लाख 38 हजार 698 महिलांची तपासणी केली होती. या तपासणीमध्ये 5 लाख 60 हजार 543 महिलांना रक्तक्षय असल्याचे समोर आले होते. या महिलांना एक नोव्हेंबर ते दहा फेब्रुवारी दरम्यान लोहयुक्त गोळ्याचे वाटप करण्यात आले होते. रक्तामध्ये 7 टक्यापेक्षा कमी हिमोग्लोबीन असणार्‍या महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इंजेक्शन देण्यात आले होते. यासोबतच लोहयुक्त गोळ्यासोबत महिलांना आहार व आरोग्याबाबत माहिती दिली होती. 0 ते 19 वयोगटातील मुलींना शाळेमध्ये, अंगणवाडीमध्ये तसेच कॉलेजमध्ये लोहयुक्त गोळ्या दिल्या होत्या. योग्य आहार आणि ओषधामुळे महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे महिलामध्ये एक ते दीड टक्क्यांनी हिमोग्लोबीन वाढले आहे. महिलांचे आरोग्यामध्ये सुधारणा झाली. ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी संजीवनी ठरली होती.

राजकीय चर्चा रंगली
यामुळे योजनाचे राजकीय आणि प्रशासकीय स्तरातून कौतूक होत होते. मात्र, यंदा जिल्हा परिषद प्रशासनाने प्रतिभा आरोग्य संपन्न योजनेला शून्य रुपयांची तरतूद केली. यामुळे ही योजना राबविली जाणार नसल्याची चर्चा आहे. राज्य शासन एकीकडे महिलाच्या आरोग्यासाठी विविध योजना राबविण्याचे आदेश देत आहे. जिल्हा परिषद महिलांच्या योजना गुंडाळण्याच्या तयारीत आहे. साधारण सत्तांतर झाल्यानंतर जुन्या योजना बंद केल्या जातात. पण जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप कंद यानी सुरू केलेली योजनाच बंद केली जात आहे. यामुळे जिल्हा परिषदेमध्ये राजकीय चर्चा रंगू लागली आहे.