निधीअभावी यातना भोगतेय बालकवींचे स्मारक

0

चार वर्षात सहकार राज्यमंत्र्यांकडून साफ दुर्लक्ष

जळगाव: आसोदा येथे बहिणाबाई चौधरींपाठोपाठ बालकवी ठोंबरे यांचे स्मारकही निधीअभावी रखडले असुन अक्षरश: यातनाच हे स्मारक भोगत असल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाचा नाकर्तेपणा आणि सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे साफ झालेले दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यातील साहित्यीकांनी मंत्र्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या चार वर्षात या स्मारकाला निधी मिळवुन देण्यात मंत्री ना. पाटील हे अपयशीच ठरल्याचे दिसून येत आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चहुकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे

असे निसर्गाचे अलवार वर्णन करणार्‍या निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी यांची 13 ऑगस्टला जयंती राज्यभर बालकवींचे पूजन आणि काव्य वाचनाने साजरी झाली. सहा वर्षांपूर्वी बालकवींच्या जन्मगावी धरणगावला त्यांचे स्मारक उभारण्याची घोषणा झाली असली तरी हे स्मारक आजही निधीच्या प्रतिक्षेत यातना भोगत आहे. आघाडी शासनाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी बालकवी ठोंबरे यांचे स्मारक बालकवींचे जन्मगाव असलेल्या जिल्हयातील धरणगाव येथे उभारण्यात येईल अशी घोषणा केली. तत्कालीन जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी चोपडा रोडवर दोन एकर जागा या स्मारकासाठी उपलब्ध करून दिली. डीपीडीसीतून 55 लाख रूपये खर्च करून या जागेवर संरक्षण भिंत उभारण्यात आली. मुंबईच्या खाजगी आर्किटेक्ट मार्फत या स्मारकाचे डिझाईन करण्याचे ठरले व डीपीडीसीतून निधी उपलब्ध करून देण्याचे ठरले होते. दरम्यानच्या काळात आघाडी सरकार गेले आणि युतीचे राज्य आले. आणि इथेच माशी शिंकली की काय? असा प्रश्‍नच या निमीत्ताने उपस्थित होऊ लागला.

जागेवर उगवली काटेरी झुडपे
बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकासाठी सुरवातीला उपलब्ध झालेल्या निधीतुन केवळ संरक्षण भिंतीचे काम करण्यात आले. त्याव्यतीरिक्त कामात कुठलीही प्रगती पुढच्या चार वर्षात झाली नाही. आज या जागेवर काटेरी झुडपे उभी आहेत. डीपीडीसीतून हे स्मारक उभारणे शक्य नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करणार आहे. या जागेवर बालकवींचे स्मारक, वाचनालय, त्यांचा चित्ररूप जीवनपट, अ‍ॅम्पी थिएटर असे स्मारकाचे स्वरूप असलेला आराखडा तयार करण्यात आला. यासाठी सुमारे सात कोटींचा खर्च अपेक्षित असून हा खर्च कोणी करायचा यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची फाईल ही धुळखात पडली आहे.

सहकार राज्यमंत्र्यांचे दुलर्र्क्ष
जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्याकडे सहकार राज्यमंत्रीपद आल्यानंतर या मतदारसंघातील साहीत्यीकांना आता स्मारक पुर्ण होईल अशी आशा लागली होती. मात्र गेल्या चार वर्षात सहकार राज्यमंत्र्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याने साहित्यीकांच्या या आशेवर अक्षरश: पाणी फेरले. गेल्या पाच वर्षापासून या स्मारकालाही निधीची प्रतिक्षा लागून राहीली आहे.

श्रेयवादाच्या फेर्‍यात अडकले स्मारक
आसोदा येथील बहिणाबाई आणि धरणगावातील बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाची मुहूर्तमेढ राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी रोवली होती. ही दोन्ही स्मारके मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असुनही निव्वळ श्रेय मिळु नये म्हणून हे स्मारक रखडविण्यात आले की काय ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.