यावल शहरात पेटला हिवाळ्यात राजकीय आखाडा ; मुख्याधिकार्यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
यावल : नगरपालिकेच्या वतीने शनिवार, 16 रोजी आयोजित विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेरील फोटोवरून भाजपा विचारांच्या नगरसेवकांच्या एका गटासह शहर काँग्रेसमध्ये तीव्र असंतोष आहे. तत्कालीन महसूल मंत्री आमदार एकनाथ खडसेंनी मिळवून दिलेल्या निधीतील विकास कामांचे भुमिपुजन करण्यास शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे येत आहेत. पालिकेत सत्ताधारी शिवसेनेकडून वर्षभरात एक काम झाले नसताना व दमडीचा निधी मिळवता आला नसताना आता दुसर्यांच्या कामांचे श्रेय लाटत स्वत:हा नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप विरोधी गटाने केला आहे.
कार्यक्रमावर भाजपा विचारांच्या सात नगरसेवकांचा बहिष्कार
शनिवारच्या नियोजित कार्यक्रमांवर भाजपा विचाराच्या सात नगरसेवकांनी बहिष्कार जाहीर केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीरखान यांनी काँग्रेसच्या आठ नगरसेवकांना कार्यक्रमास उपस्थित न राहण्याचे पत्रान्वये कळविले आहे. नगरपालिकेतील गटा-तटाच्या राजकारणाने शहरवासीयांमध्ये मात्र विकासाबद्दल साशंकता निर्माण होत आहे. शहरातील दोन कोटी 38 लाख 21 हजाराच्या विविध 11 विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी सायंकाळी सहकार पणन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होत आहे.
माजी मंत्र्यांना डावलले, मुख्याधिकार्यांकडून आचारसंहिता उल्लंघण
भूमिपूजनाची कामे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या कार्यकाळातील मंजूर कामे असल्याचा दावा अतुल पाटील यांनी केला असून या कामाचा निधी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांनी दिला असल्याने त्यांची उतराई म्हणून निमंत्रण पत्रिकेत त्यांना स्थान द्यावयास पाहिजे, असे मुख्याधिकारी यांना आम्ही सांगितले होते तसेच श्रेणीनुसार नगरसेवकांचे फोटो न छापता मुख्याधिकारी यांनी आचारसंहितेचे उल्लंघण करून लोकप्रतीनिधींना अपमानास्पद वागणूक दिल्याचे मत भाजपा नगरसेवकांनी व्क्त केले. त्यामुळे भाजपा विचाराचे सात नगरसेवक या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचे नगरसेवक अतुल पाटील, गटनेते राकेश कोलते, डॉ. कुंदन फेगडे, रुख्माबाई भालेराव यांनी सांगीतले. केवळ अनियमीत विचारांना आम्ही विरोध करतो म्हणून अशी वागणूक दिल्याचे मतही नगरसेवकांनी व्यक्त केले. काँग्रेसमध्येही असंतोष नगरपालिकेत काँग्रेसचे आठ नगरसेवक आहेत. विकासासाठी शिवसेनेच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांना नगरसेवकांकडून नेहमी सहकार्य केले जाते असे असतांना काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीरखान यांच्या फोटोंना पत्रीकेत स्थान दिले नसून काँग्रेसच्या नगरसेवकांना विश्वासात न घेता निमंत्रण पत्रिका छापल्या असल्याचे शहराध्यक्ष कदीरखान यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे. काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना नियोजितत कार्यक्रमास उपस्थित न राहण्याच्या सूचना केल्याचे ते म्हणाले.