मुंबई । बीसीसीआयची कमेटी बरखास्त झाली आहे. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली नवी समिती आणि राज्य क्रीडा संघटनांमध्ये वाद सुरू आहे. आयपीएलवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. बीसीसीआयचे सर्वाधिक कमाईचे साधन असलेल्या लोकप्रिय आयपीएल संकट ओढावले आहे . आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्यासाठी राज्य क्रीडा संघटनांना लागणा़र्या निधीचे वाटप होऊ शकणार नाही. त्यामुळे आयपीएलचे सामने आयोजित करणे कठीण होऊन बसणार आहे.सामने न झाल्यास बीसीसीआय’ला तब्बल 2,500 कोटींचे नुकसान होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या प्रत्येक सामन्यासाठी राज्य क्रीडा संघटनांना 60 लाख रुपये दिले जातात. यातील 30 लाख बीसीसीआयकडून दिले जातात, तर उर्वरित 30 लाख इतर प्रायोजकांकडून दिले जातात. राज्य क्रीडा संघटनांकडून हे पैसे सामना, सराव शिबीर, लायटिंग, मैदानातील इतर तयारी आणि ग्राऊंड स्टाफवर खर्च केले जातात. यापूर्वी आयपीएल स्पर्धेसाठी आगाऊ रक्कम दिली जायची, पण यावेळी तशी परिस्थिती राहिलेली नाही. जोपर्यंत लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी बीसीसीआय स्विकारणार नाही, तोवर बीसीसीआयला कोणताही खर्च करता येणार नसल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.