निधी परत जाऊ देण्याचा करंटेपणा करू नका : माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर पत्रकार परीषदेत हल्ला
मुक्ताईनगर : श्री क्षेत्र कोथळीसाठी आमदार चंद्रकांत पाटील हे पाच कोटी रुपये निधी आणल्याचे सांगत आहेत त्यांनी एक पत्र संबंधित विभागाला दिल्याचे दाखवा उलट मतदारसंघात आलेल्या पाच कोटी रुपयांच्या विकास कामांना स्थगिती देण्याचे करंटेपणा आमदारांनी केला आहे. मुक्ताई मंदिराचा 110 कोटींचा आराखडा असून त्यासाठी निधी आणण्यास खूप वाव आहे, जर तुम्ही निधी आणला तर मोठा हार घेऊन तुमच्या घरी येऊन सत्कार करेल, असे आवाहनच आमदार पाटील यांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिले. विविध विकासकामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे, जिल्हा बॅकेच्या माजी अध्यक्षा रोहीणी खडसे खेवलकर यांनी संबंधीत मंत्र्यांकडे निधीसाठी पाठपुरावा केल्याची पत्रे खडसे यांनी पत्रकार परीषदेत पत्रकारांना दिली. ‘हा सुर्य हा जयद्रथ’ असा टोलाही खडसेंनी आमदार पाटील यांना लगावला. मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे, स्वीय सहाय्यक योगेश कोलते उपस्थित होते.
तुकडाबंदी नियम व अटी शिथील होणार
खडसे म्हणाले की, महाराष्ट्रातील उपसा सिंचन योजनेंतर्गत व धरण बांधत असताना शेतकर्यांची जमीन संपादीत झाल्यावर उतार्यावर लाल शिक्का मारुन अधिग्रहित केली जाते व त्यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत नाही. यासंदर्भात आपण पुनर्वसन विभागाकडे पत्रव्यवहार करून हा नियम बदलला असून आता भूसंपादनाच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीला (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसल्याचेही खडसे यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 369 स्क्वेअर फूट जागेमध्ये घर बांधायचे तरतूद असताना महाराष्ट्रात तुकडाबंदी कायद्यामुळे प्लॉट सर्वसामान्यांना विकत घेता येत नाही. त्यामुळे घरकुल योजनेत अनेक लाभार्थींना लाभ मिळत नाही. त्या संदर्भातही आपण अतिरीक्त प्रधान सचिव डॉ.नितीन कलीर आणि नगरविकास सचिव महेश पाठक यांच्याकडे रीतसर मागणी केली असून येत्या पंधरा दिवसात प्लॉटच्या तुकडाबंदी चे नियम व अटी शिथील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुक्ताईनगर मतदारसंघासाठी 25 कोटी निधी मिळणार
मुंबई येथे अॅड.रोहिणी खडसे यांनी विविध मंत्र्यांच्या भेटी घेतल्या असून मुक्ताईनगर मतदार-संघासाठी 25 कोटी रुपयांचा निधी देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे याप्रसंगी खडसे यांनी सांगितले. मुक्ताई सहकारी सूत गिरणीसाठी चार कोटी रुपये मागण्यात आले असून त्यातून 12 हजार 500 स्प्लेंडरपर्यंतची क्षमता गिरणीची वाढवण्यात येईल. तसेच मुक्ताईनगर, बोदवड नगरपंचायतीसाठी पाच कोटी रुपये, 25/15 योजनेमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्याकडून पाच कोटी रुपयांची मागणी तसेच मुक्ताई मंदिरासाठी तीर्थ क्षेत्र विकास मंडळांतर्गत पाच कोटींची मागणी करण्यात आली आहे तर पाच कोटी निधीची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे देखील मागणी करण्यात आली आहे. दोन कोटी रुपये बोदवड आणि मुक्ताईनगर शहरांसाठी अल्पसंख्यांक समाजाच्या शादीखाना हॉलसाठी आपण मागितले असून मुक्ताईनगरच्या अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालयासाठी 11 कोटींची देखील मागणी करण्यात आली आहे.
आमदारांनी निधी परत पाठवण्याचा केला करंटेपणा
पाच कोटी रुपये आदित्य ठाकरे यांच्याकडून आपण मंजूर करून आणल्याचे आमदार चंद्रकांत पाटील सांगत आहेत मात्र वास्तविक ही मेहनत आपल्यासह कन्या अॅड.रोहिणी खडसे यांची आहे. आपण ही कामे मंजूर करून आणली आहेत. आणलेल्या विकास निधीवर स्टे आणून परत पाठवण्याचा करंटेपणा आमदारांनी केला असून जुना पिंप्री अकराउत कामास दोन कोटी 73 लक्ष रूपये देखील माझ्या मागणीनुसारच मंजूर करण्यात आल्याचा दावा खडसेंनी केला. त्यासाठी आमदारांची शिफारस नाही. आमदारांना आणायचे असेल तर कुर्हा, जामठी व ऐनपूर या गावांसाठी 32 केव्ळी योजनेचे विद्युत उपकेंद्र मंजूर करून घेण्याचे आव्हान याप्रसंगी खडसे यांनी केले. अडीच वर्षात आमदारांमुळे मतदारसंघात पैसे आले नाही, विकास खुंटला असून आमदार निधीतून किमान पाच लाख तरी मुक्ताई मंदिराला दिले असते किंवा डीपीडीसीमधून तरी दिले असते, असे प्रतिआव्हान देखील त्यांनी आमदारांना याप्रसंगी केले.
एक पत्र दाखवा ; घरी जावून सत्कार करणार
कोथळी येथील संत मुक्ताई मंदीर जीर्णोद्धार कामासाठी आमदारांनी निधीची मागणी केल्याचे एक पत्र तरी दाखवावे, असे आव्हान खडसेंनी दिले व व मतदारसंघातील विकास कामांना स्टे आणण्याचा करंटेपणा आमदार करीत असल्याचा आरोपही खडसेंनी करीत मंदीराच्या पर्यटनासाठी निधी आणुन दाखवावा, असे आवाहन त्यांनी केले व तसे झाल्यास आमदारांच्या घरी जात जावून मोठ्या हाराने त्यांचा सत्कार करू, असेही खडसे म्हणाले.