पुणे । पालखीतळांसाठी राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. तरीही जिल्ह्यातील विविध पालखीतळांवर करण्यात येणारी विकासकामे यंदाही रखडली आहेत. कमानी उभारणे, संरक्षण भिंती बांधणे आदी कामे पावसाळ्यापूर्वी करणे शक्य नाही. त्यामुळे ही कामे थांबविण्यात आली आहेत, तर पाऊस पडण्याआधी पालखीतळांवर मुरुम टाकण्याचे आदेश विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आले आहेत.
2 कोटींचा निधी
संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर तसेच सोपानकाका या तिन्ही पालख्या अनुक्रमे देहू, आळंदी तसेच सासवड येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असतात. ज्या गावांमध्ये पालखी मुक्काम असतो. त्या ठिकाणच्या पालखीतळांवर अनेक वर्षांपासून सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने वारकर्यांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने पालखीतळांचा विकास करण्याचे धोरण निश्चित केले. त्यानुसार प्रत्येक पालखीतळाच्या विकासासाठी 2 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून पालखीतळांना संरक्षित भिंती बांधणे, कमान आणि पालखी कट्टा बांधणे, पालखी मार्गाचे मुरुमीकरण करणे अशी विविध कामे करण्यात येणार आहेत.
पालखीतळांवर मुरुम टाका
पालखीतळांवर कमानी बांधणे, संरक्षण भिंती उभारणे आदी कामे पावसाळ्यापूर्वी करणे शक्य नसल्याने ही कामे थांबवली आहेत. तसेच पालखी तळांवर मुरुम टाकण्याच्या कामांवर लक्ष देऊन ही कामे पूर्ण करावीत, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती तीर्थक्षेत्र विकास आराखडा विशेष कार्यकारी अधिकारी उत्तम चव्हाण यांनी दिली.
कामांना मुहूर्त मिळेना
तत्कालीन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली 15 मे 2017 रोजी तीर्थक्षेत्र विकास कार्यकारी समितीची बैठकही पार पडली होती. मागील वर्षी मे महिन्यात पुणे विभागातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पालखीतळांच्या पहिल्या टप्प्यातील कामांना प्रशासकीय मंजुरी देेऊन 2 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. जिल्ह्यातील 22 पालखीतळांपैकी 13 कामांना मंजुरी मिळाली असून त्याबाबतच्या निविदा लवकरच काढण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली होती. तसेच पालखीतळांचा विकास करण्यासाठी नियमानुसार निविदा मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात काढण्यात येणार होत्या. मात्र, पालख्या मार्गस्थ होणार ही बाब लक्षात घेऊन पुणे विभागातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पालखीतळांवर पहिल्या टप्प्यात मागणीनुसार मुरुम टाकून सपाटीकरण करण्यात आले होते. परंतु, यंदाही पालखीतळांच्या कामांसाठी मुहूर्त मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात 36 ठिकाणी मुक्काम
पुणे जिल्ह्यात 22 मुक्काम आणि दोन रिंगण, सातारा जिल्ह्यात चार मुक्काम आणि एक रिंगण व सोलापूर जिल्ह्यात 10 मुक्काम आणि पाच रिंगण असे एकूण 36 पालखी मुक्काम आणि आठ रिंगण सोहळे होतात. त्यापैकी पुण्यातील तेरा, सातार्यातील तीन आणि सोलापुरातील पाच पालखीतळ विकासकामांना मागील वर्षी मंजुरी देण्यात आली होती.