महाड । युती सरकारच्या काळात तब्बल वीस कोटी रुपये खर्चून उभारलेल्या महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाकडे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. अनेक सोयीसुविधा असलेल्या या स्मारकाचा वापर योग्य प्रकारे न झाल्याने इमारतीची देखभाल दुरुस्ती करावी लागत आहे. याकरिता लागणारा निधी समाजकल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मार्च महिन्यात वर्ग करण्यात आला.
मात्र अद्याप या स्मारकातील कामांच्या निवीदाच काढण्यात न आल्याने दुरुस्तीचे काम रखडले आहे. महाडमधील माजी मंत्री प्रभाकर मोरे यांच्या प्रयत्नांनी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने 1996-97 या काळात भव्य स्मारक उभे करण्यात आले. या स्मारकात नाट्यगृह, छोटे सभागृह, वाचनालय, संग्रहालय, बारा विश्रामगृह खोल्या, तरणतलाव, कॉन्फरन्स हॉल, कार्यालयांसाठी जागा अशा अनेक सुविधा आहेत. परंतु, मूलभूत सुविधा पूर्ण होण्याआधीच तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते उद्घाटनदेखील करण्यात आले. यानंतरच्या काळात या स्मारकाची केवळ इमारतच महाडकरांना आणि महाडमध्ये येणार्या भीमसैनीकांना पाहावयास मिळत होती.
स्मारकाचा ताबा सुरुवातीला समाजकल्याण विभागाकडे देण्यात आला होता. समाजकल्याण विभागाकडे यंत्रणा नसल्याने अखेर हे काम पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडे देण्यात आले. प्रारंभी संस्थेकडूनदेखील स्मारकाकडे दुर्लक्ष झाले. केवळ नाटके, कार्यक्रम व प्रशिक्षण घेणे यासाठीच स्मारकाचा वापर होवू लागला. स्मारकातील तरण तलाव, विश्रामगृह खोल्या, कॉन्फरन्स हॉलचा वापर नाही. त्यामुळे स्मारकाची देखभाल दुरुस्ती करण्याची वेळ आली. समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा जोमाने काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता समाजकल्याण विभागाने या संस्थेला निधी मंजूर केला आहेत. संस्थेने दुरुस्तीचा आराखडा तयार करून दोन कोटी सदतीस लाख दहा हजार तीनशे एकोणचाळीस रूपये शासनाच्या महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहेत. परंतु, दहा महिने होऊनही या कामांच्या साध्या निविदाही काढण्यात आलेल्या नसल्याने स्मारकाची दुरुस्ती रखडली आहे.
कामांना विलंब केला जात असल्याने अनुयायांमध्ये नाराजी
संस्थेने तयार केलेल्या आराखड्यामध्ये स्मारकाच्या बाहेरील भिंतीस रंगकाम करणे, वस्तूसंग्रहालयाची दुरूस्ती करणे, नवीन घुमट बसवणे, स्मारकातील किचन डायनिंग हॉलची दुरुस्ती, टेरेसवरील स्टोअर रूमची दुरुस्ती करणे, नाट्यगृहासमोर अल्पोपाहार गृह, बुक स्टॉल करणे, नाटयगृहाच्या इमारतीची दुरुस्ती करणे, स्मारकाजवळ कमान उभारणे, पार्किंग आणि रॅम्पची दुरूस्ती, बगिचा दुरूस्त करणे, दोन बोअरवेल करणे, सुरक्षारक्षक खोलीचे बांधकाम करणे, कार्यालय कक्षाची दुरुस्ती करणे, आदी कामे समाविष्ट करण्यात आली आहेत. यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ दोन बोअरवेल मारणे आणि तरणतलावाची दुरुस्ती केली आहे. इतर कामांच्या निविदा अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आधी निविदा काढण्यात येतात मग पैसे मंजुरी आणि कामे केली जातात याठिकाणी मात्र पैसे आगाऊ देण्यात आलेले असतानादेखील दुरुस्तींच्या कामांना विलंब केला जात असल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये नाराजी आहे.
महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या दुरुस्तीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने निधी वर्ग केला आहे. मात्र, मध्यतंरीच्या काळात जीएसटी लागू झाल्याने निविदा काढता आल्या नाहीत. लवकरच निविदा काढून काम मार्गी लावले जाईल.
– संजय पाटील
(उपकार्यकारी अभियंता सा.बां. विभाग महाड)