समान निधी वाटप न झाल्याने सदस्यांनी सर्वसाधारण सभेत व्यक्त केली नाराजी
जळगाव: गेल्या काही दिवसांपासून जि.प.सदस्यांमध्ये असमान निधी वाटपावरून नाराजीनाट्य सुरु होते. सत्ताधारी पक्षातील सदस्यांसह विरोधकांनी यावरून जाहीरपणे नाराजी व्यक्त करत प्रशासकीय मान्यता, टेंडर प्रक्रिया थांबविण्यासाठी निवेदन दिले. सर्वसाधारण सभेत निधी वाटपाचा मुद्दा येऊ नये यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. नाराजांची मनधरणी केली, मात्र निधी वाटपाचा मुद्दा सर्वसाधारण सभेत आलाच. निधी वाटपाचे अधिकारी सर्वानुमते अध्यक्षांना देण्यात आले होते, मात्र अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी समान निधी वाटप न करता दुजाभाव केल्याचे सांगत आमचा विश्वासघात झाला असल्याची भावना सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केली. बुधवारी ४ रोजी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यावेळी सदस्यांनी निधीवाटपासह लघुसिंचन, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली. यावेळी अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण, प्रभारी सीईओ वान्मथी सी., सचिव कमलाकर रणदिवे, प्रभारी अतिरिक्त सीईओ विनोद गायकवाड आदी उपस्थित होते.
कोऱ्या चेकचा दुरुपयोगासारखा प्रकार
जि.प.सदस्यांना असमान निधी वाटपाबाबत गेल्या काही दिवसापासुन सदस्यांमध्ये खदखद व्यक्त केली जात होती. मात्र सभेत भाजपाच्या सदस्यांचे ‘बंड थंड’ झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्य आक्रमक जाहले. शिवसेनेचे गोपाळ चौधरी यांनी ‘अध्यक्षांना अधिकार दिला आणि त्यांनी विश्वासघात केला’ असे आरोप केले. कोऱ्या चेकवर सही घेऊन दुरुपयोग केल्यासारखा हा प्रकार आहे अशा शब्दात गोपाल चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली. ‘निधी द्यायचाच नसेल तर आम्ही तो परत करतो’ असेही सर्वपक्षीय सदस्यांनी सांगितले. यावर पदाधिकारी यांनी सर्वांना समान निधी देता येणार नाही, मात्र कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे सांगत निधी देण्याचे आश्वासन दिले.
राजकीय टोलेबाजी
विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा असल्याने सभेत राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. समारोपाच्या भाषणात शिवसेनेच्या नानाभाऊ महाजन यांनी विद्यमान अध्यक्षा, उपाध्यक्ष, सभापती यांना ‘पुन्हा या’ असे म्हणत खोचक टोला लगावला. समारोपाला उत्तर देतांना उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी सभागृहाचे आभार मानले.
प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन नाही
प्रत्येक सभेला अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात येत असतो. या सभेत देखील विविध व्यक्तींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आले. मात्र नवनियुक्त सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव प्रशासनाकडून स्वत:हून मांडण्यात आला नाही. यावर शिवसेनेचे जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, रावसाहेब पाटील, राष्ट्रवादीचे शशिकांत साळुंखे, कॉंग्रेसचे प्रभाकर सोनवणे यांनी आक्षेप घेत, नवनियुक्त मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्याची मागणी केली, त्यानंतर तो ठराव करण्यात आला. यावर भाजपने देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचा ठराव केला. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना टोला लगावला.
हगणदारीमुक्ती कागदावर, सदस्य आक्रमक
जिल्हा हगणदारीमुक्त झाला असल्याचा दावा केला जातो आहे. अनेक गावात दर्शनी भागात हागणदारीमुक्तीचे बोर्ड लागले आहे. मात्र प्रत्यक्षात गाव हागणदारीमुक्त झालेले नाही. ज्या ठिकाणी बोर्ड लागले आहे तेथेच अस्वच्छता आहे असे निदर्शनास आणून देत सदस्यांनी प्रशासनाचा दावा फोल ठरविला. राष्ट्रवादीचे शशिकांत साळुंखे यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली. गावात अनेक लाभार्थ्यांना शौचालये नाही व अनुदान ही मिळाले नाही याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तर जयश्री पाटील यांनी गावात शौचालये काही ठिकाणी राहीली असली तरी वापर फक्त २५ ठीकाणी होत आहे. त्यामुळे शौचालयांचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना ग्रामसेवकांना द्याव्यात अशी मागणी केली.
शिक्षकांच्या समायोजनात गैरव्यवहार
शाळांना सुट्या असताना तब्बल १ कोटी ८३ लाखांचे बिले अदा करण्याचा घाट घातला जात होता. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने बिले अदा होऊ शकले नाही. यावरून सदस्या पल्लवी सावकारे यांनी कारवाईची मागणी केली. यावर प्रशासनाने अद्याप बिले अदा करण्यात आलेली नसून गटशिक्षणाधिकारी यांना चौकशीच्या सूचना केल्याचे सांगितले. तसेच उन्हाळी सुटीत खरेदी करण्यात आलेले धान्यादी पुढे काही दिवस वापरला गेल्याचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी सांगितले. यासह पल्लवी सावकारे यांनी शिक्षक समायोजनात गैरप्रकार झाल्याचे आरोप केले. काही तालुक्यात जागा रिक्त असतानाही अनेक शिक्षकांची बदली दुसऱ्या ठिकाणी केल्याचे सांगितले. पैसे घेऊन बदल्या केल्याचे आरोपही सौ.सावकारे यांनी केले.
भजनी मंडळाचा निधी लटकला
जि.पच्या सभेत भजनी मंडळाच्या साहीत्यावरून शिवसेनेचे प्रताप पाटील व भाजपचे अमित देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला. गेल्या दोन वर्षापासुन ७४ लाखाचा निधी आला असतांना त्यावर कुठले ही नियोजन झाले नसल्याचे सांगितले. त्यावर अधिकाऱ्यांनी हा निधी डीबीटी केल्याशिवाय पर्याय नाही असे सांगितले. तसेच निवीदा प्रक्रियाबाबत शासनाने मंजुरी देखील दिली नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी सदस्यांनी ग्रामिण भागातील नागरीक धर्मदाय आयुक्ताकडे रजिस्ट्रेशन करेल व नोंदणी करेल ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने मार्ग काढण्याची मागणी केली.
सत्ताधारी सदस्य विरोधकांच्या रांगेत
जि.प.अध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राजकीय समीकरण जुळविण्यास सुरुवात देखील झाली आहे. राज्याच्या धर्तीवर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी होईल असा दावा केला जातो आहे. त्यातच बुधवारी झालेल्या सभेत सत्ताधारी भाजपचे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सदस्य अमित देशमुख हे विरोधी सदस्यांच्या रांगेत जाऊन बसले होते. तेथूनच त्यांनी प्रश्न देखील विचारले. यावर काही सदस्यांनी चिमटा देखील घेतला. यावरून जि.प.त महाविकास आघाडीची एकच चर्चा रंगली.
उपाध्यक्षांनी अध्यक्षांना सावरले
शिवसेनेचे प्रताप पाटील यांनी तरसोद येथील मंदिराच्या कामाची फाईल अनेक दिवसांपासून अडविण्यात आली असल्याची तक्रार केली. यावरून काहीसा गोंधळ झाला, या गोंधळात अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी प्रताप पाटील ‘माझ्याशी नीट बोलले नाही त्यामुळे त्यांची फाईल अडविली आहे’ असे सांगत होत्या, मात्र हा प्रकार उपाध्यक्षांच्या लक्षात आल्याने त्यानी वेळीच अध्यक्षांना सावरले. गोंधळात अध्यक्षा काय बोलल्या हे कोणाच्या लक्षात आले नसल्याने पुढील गदारोळ टळला.