निफाड ते मनमाड दरम्यान 120 च्या गतीची चाचणी

0

भुसावळ । निफाड ते मनमाड दरम्यान रेल्वे गाड्यांची गती वाढविण्याच्या दृष्टीने 120 च्या गतीची चाचणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांच्या पथकाद्वारे शनिवार 14 रोजी करण्यात आली. भुसावळ विभागाच्या वार्षिक निरीक्षणासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांचे शनिवार 14 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास फलाट क्रमांक 8 वर विशेष निरीक्षण यानाने आगमन झाले. यावेळी त्यांनी स्थानकावर पाहणी करुन येथील सुविधांचा आढावा घेतला. तर खासदार रक्षा खडसे यांच्याशी चर्चा केली असता खासदार खडसे यांनी देखील भुसावळ विभागातील समस्या मार्गी लावण्याच्या सुचना केल्या.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील वार्षिक तपासणीनिमित्त ईगतपुरी ते मनमाड या भुसावळ विभागातील रेल्वे स्थानकांची पाहणी करण्यात आली असून ईगतपुरी येथून 9.30 वाजेच्या सुमारास रवाना होवून येथील गेट क्रमांक 84 ची पाहणी करण्यात आली.

यानंतर देवलाली येथे स्थानकावर, नाशिक येथे राजभाषा प्रदर्शनीला भेट देवून स्थानकासह नवीन सिन्नर फाटा कॉलनी तसेच ओएचई विभागाची पाहणी, यानंतर स्थानिक खासदार व झेडआरयुसीसी सदस्यांसह बैठक घेण्यात आली. यानंतर गोदावरी नदी पुलाचे निरीक्षण करुन निफाडहून लासलगाव येथे पाहणी केल्यानंतर भुसावळ येथे आगमन झाल्यानंतर स्टेशन मॅनेजर आर.के. कुठार यांनी त्यांचे स्वागत केले. नविन फ्लाय ओव्हर ब्रीजची पाहणी करुन येथील लिफ्टचे उद्घाटन केले. तसेच व्हीआयपी कक्षात खासदार रक्षा खडसे यांसह विविध कामगार संघटनाच्या पदाधिकार्यांची चर्चा केली. यावेळी केळी वॅगन्स संदर्भात खासदार रक्षा खडसे यांनी विचारणा केली. तसेच प्रवासी मंचच्या पदाधिकार्यांनी देखील आपापल्या समस्या मांडल्या.