मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील तरुण विजय दिनकर डहाके याच्या खून प्रकरणी अटकेतील पाचही संशयीत आरोपींना भुसावळ न्यायालयाने शनिवार, 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
खुनाच्या संशयावरून पाच संशयीतांना अटक
निमखेडी खुर्द येथील तरुण विजय दिनकर डहाके हे रविवार, 5 सप्टेंबर रोजी मद्य प्राशनासाठी सारोळा येथे गेल्यानंतर शुभेच्छा फलकाच्या कारणावरून त्यांना काहींनी धक्काबुक्की केली होती मात्र या घटनेनंतर ते घरी न परतल्याने त्यांचे भाऊ ज्ञानदेव डहाके यांनी भावाचे अपहरण झाल्याप्रकरणी सोमवारी पोलिसात काही संशयीतांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या घटनेच्या 24 तासानंतर मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सारोळा शेती शिवारातील संतोष सुरवसे यांच्या शेतात विजय डहाके यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. विजय डहाके यांचा संशयीतांनी खून केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केल्यानंतर अपहरणाच्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आल्यानंतर संशयीत लक्ष्मण भिका कोळी, अजय लक्ष्मण कोळी, अरुण गायकवाड, विलास बेलदार तसेच रतन सुरवाडे अशा पाच आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली. पाचही संशयीतांना बुधवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता शनिवार, 11 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, मयत विजय डहाके यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर काही बाबी स्पष्ट होणार आहेत. मयत विजय यांच्या मृतदेहावर बुधवारी निमखेडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.