मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मुक्ताईनगर येथील जुने मुक्ताई मंदिर रस्त्यावरील आस्थानगरी जवळ मंगळवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. अविनाश अरुण लवांडे (22) असे मयत तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
निमखेडी खुर्द येथील अविनाश अरुण लवांडे (22) हा पत्नीसह मुक्ताईनगर येथील अष्टविनायक कॉलनी येथे लग्नासाठी आला होता. त्यानंतर त्याने बाहेरुन येतो, असे पत्नीला सांगुन मंगळवारी दुपारी चार वाजता निघाला मात्र बराच वेळ परत आला नाही. त्याचा सायंकाळी सात वाजेपर्यंत नातेवाईकांनी शोध घेतला परंतु तो आढळून आला नाही त्यामुळे सुनील उत्तम लवांडे यांनी हरवल्याची तक्रार दाखल केली. परंतु अविनाश अरुण लवांडे याचा मृतदेह मंगळवार, 8 रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर ते जुने मुक्ताबाई मंदिर मार्गावरील आस्थानगरीजवळ आढळून आला. मयत तरुण हा विविध कार्यकारी सोसायटीतील सेक्रेटरी अरुण लवांडे यांचा मुलगा आहे.त् याच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परीवार आहे. दरम्यान सुनील उत्तम लवांडे (46, निमखेडी) यांनी मुक्ताईनगर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार शैलेश चव्हाण करीत आहेत.