नंदुरबार : ‘करोना’ विषाणूच्या संसर्गाबाबत अन्य जिल्ह्यातील अनुभव लक्षत घेता नियंत्रक अधिकाऱ्यांनी सहायक पथके तयार ठेवावीत व ऐनवेळच्या नियोजनासाठी तयार रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत.
सर्व क्षेत्रीय प्रमुख अधिकाऱ्यांना आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती देण्यात यावी. प्रत्येक अधिकाऱ्याकडे स्वतंत्र जबाबदारी सोपविण्यात यावी. या प्रक्रीयेत सहभागी सर्व अधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी त्यांच्याकडील नियोजन तयार ठेवावे व त्यानुसार आवश्यक साधनसामुग्रीचा आढावा घ्यावा.
अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रात सुरू असलेली वैद्यकीय तपासणी, क्वॉरंटाईन सुविधा, औषध फवारणी, जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता याची माहिती दैनंदिन स्वरुपात घ्यावी. या संपूर्ण प्रक्रीयेत अडचणी असल्यास त्या सोडिविण्यासाठी तात्काळ आवश्यक निर्णय घ्यावेत. जिल्हास्तरावरून सहकार्य आवश्यक असल्यास तसे नियंत्रण कक्षास कळवावे असे आदेश देण्यात आले आहे.
गावपातळीवर स्वयंसेवकांचे सहकार्य
भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अशी परिस्थिती हाताळण्यासाठी गट विकास अधिकारी आणि नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी वॉर्डनिहाय स्वयंसेवकांची यादी तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दिले आहेत. स्वयंसेवक हा स्वेच्छेने आपत्कालीन कार्यात सहभागी होण्यास तयार असावा. त्याचे सर्वसाधारण आरोग्य चांगले असावे व वय 45 पेक्षा अधिक नसावे. याद्या गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्या स्वाक्षरीने तर नगर पालिका स्तरावर मुख्याधिकारी व नगरसेवक यांच्या स्वाक्षरीने 30 मार्च पर्यंत जमा कराव्यात असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कृषी माल वाहतूकीसाठी मंडळ कृषी अधिकाऱ्यांना अधिकार
शेतकरी व कृषी मालाचे व्यापारी यांना जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर वाहतूकीसाठी अडचणी येऊ नयेत यासाठी त्यांना प्रमाणपत्र देण्याचे अधिकार मंडळ कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी आदेशाद्वारे त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी प्राधिकृत केले आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हे तालुकानिहाय व मंडळ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करतील व आवश्यक प्रमाणपत्र वितरणाचे नियोजन करतील. प्रमाणपत्र वाटपात दिरंगाई किंवा गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नंदूरबारमध्ये मंगळ बाजार हलविला
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी मंगळ बाजार, जळका बाजार आणि गांधी चौक या अरुंद ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांना शहरातील वेगवेगळ्या मैदानात तसेच मोकळ्या जागेत स्थलांतरीत करण्यात आले. तसेच विक्रेत्यांना वस्ती आणि कॉलनीत जाऊन विक्री करण्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे.
धडगाव येथे औषध फवारणी
धडगाव येथे ट्रॅक्टरच्या सहाय्याने औषध फवारणी करण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. फवारणीद्वारे सुक्ष्मजंतूंचा नाश करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.
बाहेरून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण