नियंत्रण सुटल्याने कारची झाडाला धडक

0

शिरपूर । रस्त्यावरील खड्डा चुकवितांना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार झाडावर आदळल्याची घटना गुरुवार, 12 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शिरपूर-चोपडा मार्गावरील तांडे गावाजवळील सुतगिरणीसमोर घडली. या घटनेत चालकासह दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

असा झाला अपघात…
मध्यप्रदेशातील मंडवाडा येथील ओमप्रकाश यशवंत दरबार-राजपूत (वय-25), हरिष प्रताप सोलंकी (वय-25) व आश्‍विन प्रेमजी सोलंकी (वय-28), हे तिघेही चारचाकी (क्र. एम.पी. 09. सीएम. 1910) ने चोपडा येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते गावाकडे परत जात असतांना शिरपूर-चोपडा मार्गावरील तांडे गावाजवळील प्रियदर्शिनी सुतगिरणीच्या जुन्या गेटजवळील एका लिंबाच्या झाडाला त्यांची कार ठोकली गेली. रस्त्यावरील खड्डा चुकवितांना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. कार वेगात असल्यामुळे तिचा ड्रायव्हर साईडचा भाग पूर्णपणे दाबला जाऊन चालक ओमप्रकाश दरबार-राजपूत व त्याच्या पाठीमागे बसलेला हरिष सोलंकी हे दोघे जागीच ठार तर आश्‍विन सोलंकी गंभीर जखमी झाला.