एनगाव गावाजवळील घटना, भावा-बहिणीसह चौघे जण जखमी
बोदवड- नियंत्रण सुटल्याने भरधाव चारचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात 48 वर्षीय महिला जागीच ठार झाली तर चालकासह अन्य चौघे जखमी झाल्याची घटना ऐनगावजवळ बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. सविताबाई सुभाष गलवाडे (वय 48) असे मृत महिलेचे नाव असूव तर गाडी चालवणारा त्यांचा मुलगा सागर आणि मागे बसलेली मुलगी सिलिका व अन्य दोघे या अपघातात जखमी झाले.
नियंत्रण सुटल्याने अपघात
भुसावळ येथील रहिवासी सविताबाई गलवाडे यांचे कुटुंब आजीला भेटण्यासाठी कुर्हाकाकोडा येथे गेले होते. परतीच्या प्रवासात चारचाकी (के.ए.51 एस.सी.4589) ने मुलगा तथा चालक सागर सुभाष गलवाडे हा चालवत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने ती ऐनगावजवळील ग्रामीण रुग्णालयाजवळ असलेल्या निंबाच्या झाडावर जावून आदळली. या अपघातात सविताबाई सुभाष गलवाडे (वय 48, पूर्व हुडको, भुसावळ) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा तथा चालक सागर सुभाष गलवाडे, त्याची बहिण सिलिका तसेच गाडीत असलेले गौरव नानासाहेब शिंदे (रा.नेवासा फाटा, जि.अहमदनगर) आणि प्रसाद विठ्ठल पाटील (रा.करमाळा, जि.सोलापूर) हे जखमी झाले. जखमींवर एणगाव येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगाव येथे खाजगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले तर मयत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बोदवड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. आरोपी चालक सागर सुभाष गलवाडे विरुद्ध गोपाल एकनाथ मेहसरे (मलकापूर) यांनी फिर्याद दिल्यावरून बोदवड पोलिसात स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास संजय भोसले करीत आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेला भुसावळ येथील सागर गलवाडे हा नुकताच पुणे येथे इंजिनिअर झाल्याने मित्रांसह कुर्हा काकोडा येथे आजीला पाहण्यासाठी गेला होता. मात्र, अपघातात त्याला आईला गमवावे लागले.