पिंपरी: राज्यसरकारने काही अटी शिथिल करत दुकानांना परवानगी दिली होती. पिंपरी मुख्य बाजारपेठेत नियमांची पायमल्ली केल्याने अवघ्या पाच दिवसात बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. सर्वच शासकीय नियमांची पायमल्ली होऊ लागल्याने आयुक्तांनी आदेश दिले आहेत.
टाळेबंदी ४ च्या सुधारित नियमांनुसार, राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश नॉन रेड झोन केल्यानंतर महापालिकेने अनेक सवलती जाहीर केल्या होत्या. त्यानुसार, गेल्या शुक्रवारपासून बाजारपेठ खुली करण्यात आली होती. टाळेबंदीमुळे दोन महिने शुकशुकाट अनुभवणाऱ्या बाजारपेठेत पहिल्या दिवसांपासून गर्दी उसळू लागली.
बाजारपेठेतील शगुन चौक, डीलक्स चौक, कराची चौक, आर्य समाज चौक, साई चौक, गेलॉर्ड चौक, रमाबाई आंबेडकर चौक, संत गाडगे महाराज चौकातील दुकाने तसेच दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून शासकीय नियमांचे उल्लंघन होऊ लागले होते. सर्वत्र नागरिक गर्दी करू लागले होते. दोन व्यक्तींमधील सुरक्षित अंतर राखले जात नव्हते. सम-विषम तारखेनुसार दुकाने सुरू ठेवण्याचा नियम पाळला जात नव्हता. मास्कचा वापर केला जात नव्हता. दुचाकीवर एकाने तथा चारचाकीत तीनजणांनी प्रवास करणे अशा नियमांना नागरिकांनी केराची टोपली दाखवली होती. अशा परिस्थितीत, करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन बाजारपेठ बंद करण्यात आली.
३१ मे पर्यंत हा आदेश लागू राहणार असून त्यानंतरची परिस्थिती पाहून पुढील निर्णय होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.