लोणीकंद पोलीसांच्या नियोजनामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यास यश
वाघोली : पुणे-नगर महामार्ग वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अवजड वाहतुकीला प्रायोगिक तत्त्वावर बंदी घालण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार जिल्हा वाहतूक शाखा आणि लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने जड वाहनांवर कडक कारवाईचा धडाका सुरु करण्यात आला आहे. नगर महामार्गावरील लोणीकंद ते खांदवे नगर (तेल्याची मोरी) पर्यंत महामार्गावर सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत व सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत दि. 5 नोव्हेंबर पासून पुढील एक महिना प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली होती.
अनेकांनी गमविले जीव…
गेल्या एक महिन्यापासून जिल्हा वाहतूक शाखा, स्थानिक पोलीस स्टेशनकडून अवजड वाहनांवर कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. बेशिस्त व नियम मोडून भरधाव धावणार्या वाहनांमुळे किरकोळ, गंभीर अपघातांचे प्रमाणदेखील गेल्या काही वर्षामध्ये वाढ झाली होती. यात अनेकांना जीव गमवावे लागले. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी नागरिकांच्या सहकार्य आणि योग्य नियोजनामुळे गेल्या काही महिन्यांपासून वाघोलीतील कोंडी सोडवण्यास यश मिळवले आहे. ही कारवाई सहा. पो. निरीक्षक रामदास शेळके, सहा. पो. निरीक्षक सुधीर तोरडमल व वाहतूक कर्मचारी यांच्या वतीने करण्यात येत आहे. अवजड वाहनांवरील प्रायोगिक तत्वावर करण्यात येणारी कारवाई कायमस्वरूपी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
लोणीकंद येथे पार्किंग
रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अवजड वाहनांवर कारवाई केल्यानंतर वाहने लावण्यासाठी लोणीकंद येथे प्रशस्त जागा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच वाघोली येथे कारवाई करण्यात येणार्या वाहनांना केसनंद फाटा येथील पोलीस चौकीमधील जागेत वाहने लावण्यात येत आहेत.