पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची स्पष्टोक्ती
मुंबई : महाबळेश्वर मधील हॉटेलवर झालेल्या कारवाईचा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कसलाही संबंध नसल्याचे सांगत नियमांचे उल्लंघन केल्यानेच त्या हॉटेलवर कारवाई केली असल्याचा दावा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना केला.
यावेळी बोलताना कदम म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी महाबळेश्वर मधील संबंधित हॉटेलची पाहणी केली असता त्या ठिकाणी सांडपाणी नगरपालिकेच्या लाईनमध्ये प्रक्रिया न करता सोडले जात असल्याचे आढळून आले. त्याच प्रमाणे संबंधित हाॅटेल मध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर कसलीही प्रक्रिया केली जात नव्हती. या हाॅटेल मधील एकूण 27 खोल्या या अनधिकृत असल्याच्या आढळल्या आहेत. म्हणून आठ दिवसांची नोटीस देऊन नंतरच कारवाई केली असल्याचे पर्यावरणमंत्री कदम यांनी सांगितले आहे.
या नियमानुसार महाबळेश्वर मधील हाॅटेलवर कारवाई केली असून या नियमाद्वारे लोणावळामध्ये एकूण 16 हॉटेल बंद केली आहेत, तर मुंबईतील 30 मोठ्या हॉटेलची तपासणी सुरू असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली. येत्या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर 55–65 डेसीबल मर्यादेच्या आवाजाला परवानगी असल्यामुळे डिजेला परवानगी नाही असे स्पष्ट करतानाच या नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असेही पर्यावरण मंत्री कदम यांनी सांगितले.