नियमांचे पालन करत पळासनेरला धोबी समाजात आदर्श विवाह

0

शिरपूर:कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे संचारबंदी असुन देशासह राज्यात सर्वत्र सर्वच कार्यक्रमांना बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे अनेकांना आपले नियोजित विवाह पुढे ढकलावे लागले आहेत. अशातच शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे नियमांचे पालन करत कुठलाही गाजावाजा न करता सोशल डिस्टन्सिंग पाळून तोंडाला मास्क लावुन धोबी समाजात आदर्श विवाह पार पडला. विवाह सोहळ्याची धामधुम न केल्यामुळे नवरदेव दीपक शिरसाठ याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निधीसाठी प्रत्येकी 5 हजार 100 रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

तालुक्यातील पळासनेर येथील वर दीपक बन्सिलाल शिरसाठ-धोबी व शहादा येथील वधु धनश्री गोविंद बच्छाव-धोबी यांचा विवाह अवघ्या 10 जणांच्या उपस्थितीत पळासनेर येथे वराच्या घरी 27 एप्रिल रोजी पार पडला. याप्रसंगी परिट (धोबी) सेवा मंडळाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बोरसे, सांगवीच्या माजी उपसरपंच अरुणा बोरसे, पळासनेर उपसरपंच सतीष वाणी यांच्यासह वराचे आई, मामा, बहीण, मेव्हुणे तर वधुची आई, मामा, मावशे आणि भटजीच्या मंत्रोच्चाराच्या साक्षीने विवाह पार पडला. दीपक व धनश्री या नवदाम्पत्यांना अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, परिट (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे यांनी शुभेच्छा दिल्या.

लॉकडाऊनमुळे वर-वधुने कोणत्याही नातेवाईक व वर्‍हाडी मंडळींची गर्दी केली नव्हती. अत्यंत साध्या पध्दतीने तोंडाला मास्क लावत हा विवाह सोहळा पार पडला. समाजाने या विवाहाचा आदर्श घेऊन जिल्ह्यासह इतर ठिकाणी कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे पुर्वनियोजित विवाह तिथीनुसार नियमाचे पालन करुन साध्या पध्दतीने गर्दी व गाजावाजा न करता पार पाडण्यासाठी समाजातील त्या-त्या भागातील प्रमुख व्यक्तीने पुढाकार घ्यावे, असे आवाहन अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांनी केले आहे.