नियमित प्रशिक्षणातून राष्ट्रीय हॉकीपटू घडतील!

0

उद्घाटनप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांचे मत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने हॉकी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. शहरातील धनराज पिल्ले व विक्रम पिल्ले यांच्यासारख्या राष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनामुळे पालिका शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता चांगले प्रशिक्षण, चांगल्या सुविधा खेळाडूंसाठी दिल्या जात आहेत. त्यामुळे चांगले प्रशिक्षण घेऊन या मुलांनी आपले आणि शहराचे नाव उज्ज्वल करावे. शहरातील खेळाडूंनी नियमितपणे सराव करावा. प्रशिक्षणसाठी लागणार्‍या सर्व सोई-सुविधा महापालिकेच्यावतीने पुरविण्यात येतील. ऑलिम्पिक दर्जाच्या खेळाडूंकडून नियमित प्रशिक्षण घेऊन शहरातून दरवर्षी किमान 4 राष्ट्रीय हॉकीपटू तयार झाले पाहिजेत, अशी अपेक्षा पालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी नेहरूनगर येथे रविवारी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड महापालिका व विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमीच्या सहकार्याने नेहरूनगरातील ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडिमय येथे 12, 14 आणि 18 वर्षांखालील मुले व मुलींसाठी दि. 15 एप्रिलपासून हॉकी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या औपचारिक उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, ऑलिम्पिक हॉकीपटू विक्रम पिल्ले, आंतरराष्ट्रीय हॉकीपटू विकास पिल्ले, आंतरराष्ट्रीय पंच श्रीधरन तंबा, राष्ट्रीय खेळाडू विल्यम डिसूजा, राष्ट्रीय प्रशिक्षक मनोहर सुब्रमण्यम तसेच, राष्ट्रीय खेळाडू व हॉकीप्रेमी उपस्थित होते.

शिस्त, जिद्द व ध्येयपूर्ती महत्वाची
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, खेळांमध्ये शिस्त, जिद्द आणि ध्येयपूर्ती या तीन महत्वाचा गोष्टी आहेत. त्यासाठी लागणारी मेहनत व चिकाटी तुमच्याजवळ असेल, तर तुम्ही सुद्धा एक दिवस विक्रम पिल्ले यांच्यासारखे ऑलिम्पिक हॉकीपटू बनू शकाल. त्यासाठी नियमित सराव केला पाहिजे. पालिकेने पॉलिग्रास मैदान व प्रशिक्षणासाठी ऑलिम्पिक खेळाडू उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा लाभ शहरातील सर्व शाळांमधील खेळाडूंनी घ्यावा. अनेकदा हॉकीचे प्रशिक्षण घेण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. पण आपल्या पालिकेतील विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून दिले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी याचा फˆˆायदा करून घेतला पाहिजे.

शिबिरात पालिका व खासगी शाळांच्या एकूण 250 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. त्यांना हॉकी स्टीक, चेंडू, टी शर्ट, दररोज पोषक आहार आणि सरावाचे आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिबिर सकाळी 7 ते 9 आणि दुपारी 4 ते 6 या वेळेत 14 मे पर्यंत चालणार आहे. क्रीडा पर्यवेक्षिका अनिता केदारी यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा पर्यवेक्षक ज्ञानेश्‍वर भिसे यांनी आभार मानले.