नियमित योगाभ्यासामुळे कार्यक्षमतेवर होतात सकारात्मक परिणाम

0

भुसावळ । नियमित योगाभ्यास केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभते. मन प्रसन्न राहते याचा अतिशय चांगला सकारात्मक परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होत असल्याचे विचार दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी व्यक्त केले. दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. उपमुख्य अभियंता एल.बी. चौधरी, माधव कोठुळे आणि नितिन गगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम वसाहतीमधील नवीन क्रीडा भवनात पार पडला.

योगसाधकांनी प्रगट केले अनुभव
यावेळी योगसाधकांना आलेले अनुभव वार्तापत्राच्या माध्यमातून प्रकट करण्यात आले असून योगवार्तापत्राचे मुख्य अभियंता बावस्कर यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. योग साधकांच्या योग गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. योग शिक्षक तथा वित्त व लेखा विभागाचे व्यवस्थापक राजेंद्र भंडारी यांनी स्वागत करून आपल्या प्रस्तावनेत योग साधनेचे महत्त्व स्पष्ट केले. सकाळी पुरक व्यायाम, योगासन, प्राणायाम, हास्ययोग केल्यानंतर नियमित योग साधना करणार्‍या साधकांनी आपले मनोगत आणि अनुभव कथन केले.

यांची होती उपस्थिती
नियमित योगाभ्यास केल्यामुळे काम करतांना उत्साह वाढला, काम करण्याची क्षमता वाढली, कामात आनंद मिळू लागला, असे अनेकांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमास अधिक्षक अभियंता एन.आर. देशमुख, कल्याण अधिकारी पंकज सनेर, प्रविण बुटे, यशवंत सिरसाट, राजेंद्र निकम, विभाग प्रमुख आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शैला सावंत यांनी तर आभार आरती भंडारी यांनी मानले.