नियम डावलून फेकरी टोल नाक्यावर लूट

0
प्रांताधिकार्‍यांना निवेदन ; आंदोलनाचा इशारा
भुसावळ- तालुक्यातील फेकरी टोल नाक्यावर फेकरीसह दीपनगर, निंभोरा गावातील स्थानिक रहिवाशांकडूनही टोल वसुली सुरू असून दीपनगरातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वाहनांना अडवूनही वसुली होत असल्याने हा प्रकार तातडीने थांबवावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसने दिला आहे. या संदर्भात प्रांताधिकारी प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. फेकरी गावासमोरील रेल्वे लाईन खालून जाणार्‍या रस्त्यावर मोठ-मोठे ब्रेकर्स तयार करण्यात आल्याने वाहनांच्या तळांना मोठे दणके बसत आहेत. दीपनगरात जाणार्‍या वीज कर्मचार्‍यांचा हा प्रमुख रस्ता असल्याने कर्मचार्‍यांना मोठा मनस्ताप होत आहे. बे्रकर्सदेखील तातडीने लहान कमी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तर आंदोलनाचा इशारा
फेकरी इन्फ्रास्ट्रक्चर यांना राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसने निवेदन दिले असून तातडीने बेकायदा वसुली थांबवावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर अरुण दामोदर, वर्कर्स फेडरेशन जे.एस.वराडे, रामा धांडे, कैलाश झोपे, रामकृष्ण कारंडे, भगवान निरभवणे, अनिकेत नवले, नरेश वाघ आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.